Perfect Sabudana Khichdi:साबुदाणा खिचडी नॉनस्टिक कढईत करुनही चिकटतेच ? 'असा' भिजवा साबुदाणा - प्रत्येक दाणा मोकळा खिचडी मऊ लुसलुशीत...

श्रावण महिना सुरू होताच अनेक भक्त उपवास करण्यास सुरुवात करतात. उपवासाच्या काळात खमंग, मऊ आणि मोकळ्या साबुदाणा खिचडीची आठवण येते. मात्र, अनेकांना खिचडी बनवताना स
श्रावण महिना सुरू होताच अनेक भक्त उपवास करण्यास सुरुवात करतात. उपवासाच्या काळात खमंग, मऊ आणि मोकळ्या साबुदाणा खिचडीची आठवण येते. मात्र, अनेकांना खिचडी बनवताना समस्या येतात; साबुदाणा चिकटतो किंवा आतून कडक राहतो. यामुळे खिचडीची चव बिघडते आणि मेहनत वाया जाते. साबुदाणा खिचडी मोकळी आणि मऊ बनवण्यासाठी 'साबुदाणा योग्य पद्धतीने भिजवणे' हे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य प्रमाणात पाणी आणि योग्य वेळ भिजवल्यास खिचडी दरवेळी दाणेदार आणि मऊ होईल. साबुदाणा योग्य पद्धतीने भिजवला की प्रत्येक दाणा मोकळा, मऊ आणि मोत्यासारखा दिसतो. याशिवाय काही खास टिप्स फॉलो केल्यास खिचडी नेहमीच परफेक्ट होते. साबुदाणा भिजवण्यापूर्वी तो २-३ वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्यावरील अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि खिचडी चिकटत नाही. साबुदाणा धुतल्यानंतर त्यात पाणी घालताना विशेष काळजी घ्या. साबुदाणा बुडेल आणि त्याच्यावर फक्त १/२ इंच पाणी राहील इतकेच पाणी घाला. जास्त पाणी घातल्यास साबुदाणा पचपचित होतो. साबुदाणा कमीत कमी ६ ते ८ तास किंवा रात्रभर भिजत ठेवावा. यामुळे तो आतपर्यंत छान मऊ फुलतो. भिजल्यानंतर साबुदाण्याला हाताने मोकळा करून पहा. जर तो थोडा कोरडा वाटत असेल, तर त्यावर पाण्याचा हलका हबका मारा आणि १० मिनिटे झाकून ठेवा. भिजल्यानंतर एक साबुदाण्याचा दाणा बोटांमध्ये दाबून पाहा. तो सहज चिरडला गेला, तर साबुदाणा योग्य प्रकारे भिजला आहे असे समजावे.
दाण्याचे कूट आणि साबुदाणा एकत्र करणे हे देखील महत्त्वाचे आहे. कढईत टाकण्यापूर्वी भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये भाजलेल्या दाण्याचे कूट, मीठ आणि साखर एकत्र करून हाताने छान मिक्स करून घ्या. यामुळे साबुदाण्याचा प्रत्येक दाणा वेगळा राहतो. दाण्याचा कूट एकदम पिठासारखा बारीक करू नका; कूट थोडे जाडसर आणि भरड केलेले असावे, यामुळे खिचडीला छान टेक्स्चर येते. खूप मोठ्या आचेवर खिचडी शिजवल्यास साबुदाणा पटकन चिकटतो. त्यामुळे मध्यम किंवा लहान आचेवर हलक्या हाताने परतावे. फोडणी दिल्यानंतर साबुदाणा कढईत खूप वेळ परतू नये. जास्त वेळ परतल्याने साबुदाणा कडक किंवा चामट होतो. साबुदाण्याचा रंग पारदर्शक झाला की समजायचे खिचडी तयार आहे. खिचडी छान मऊ होण्यासाठी शेवटी कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर २-३ मिनिटे छान वाफ काढून घ्या. खिचडीत बटाटा वापरणार असाल तर तो आधी तेलात किंवा तुपात चांगला परतवून किंवा उकडवून घ्या, जेणेकरून साबुदाणा टाकल्यावर तो लगेच शिजेल. खिचडी सतत ढवळू नका, त्यामुळे साबुदाण्याचे दाणे तुटतात आणि खिचडीचा गोळा होतो. गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस घातल्यास खिचडीची चव वाढते आणि दाणे अधिक मोकळे राहतात.



















