Wheat Prices Surge:गव्हाच्या दरात तेजी; तीन वर्षांतील उच्चांक, भारताला निर्यातीची संधी

नागपूर : जागतिक बाजारात गव्हाच्या पुरवठ्यावर युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. फेब्रुवारी २०२६ पासून गव्हाच्या दरात वाढीला सुरुवात झाली असून, शिकागो बोर्ड
नागपूर : जागतिक बाजारात गव्हाच्या पुरवठ्यावर युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. फेब्रुवारी २०२६ पासून गव्हाच्या दरात वाढीला सुरुवात झाली असून, शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडमध्ये (सी-बॉट) फेब्रुवारी ते जुलै या कालावधीत १४ टक्के दरवाढ नोंदवली गेली आहे. हा दर मागील तीन वर्षांतील उच्चांक आहे. त्यामुळे भारतीय बाजारात मिल क्वॉलिटी गव्हाचे दर एमएसपीच्या जवळ आले आहेत. भारताच्या शेजारील देशांना गव्हाची आयात महाग पडत असल्याने, भारताला गहू निर्यात करण्याची संधी मिळाली आहे. शेजारी राष्ट्रांना गव्हाची आयात करण्यासाठी दूरच्या देशांकडे जावे लागते, ज्यामुळे त्यांना अधिक खर्च करावा लागतो. यामुळे भारताच्या निर्यातीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
गव्हाच्या वायदे बाजारात सध्या ७ डॉलर प्रति बुशेल दराने गव्हाचे वायदे चालू आहेत, जे २,३९६ रुपये प्रतिक्विंटल आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव, होर्मुज सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक आणि एल निनोमुळे युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील गव्हाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. यामुळे जागतिक बाजारात गव्हाचा पुरवठा प्रभावित झाला आहे आणि त्याचा परिणाम गव्हाच्या दरवाढीत झाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे वाहतूक आणि विमा खर्चात वाढ झाल्याने बांगलादेश, श्रीलंका आणि इतर शेजारी राष्ट्रांना गव्हाची आयात महागात पडत आहे. त्यामुळे भारतातून गहू आयात करणे या देशांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.



















