Livestock Insurance Scheme Launch:राज्यात पशुधन विमा योजना सुरू होणार

मुंबई: केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एनएलएम) एक नवीन पशुधन विमा योजना लवकरच राज्यात लागू करण्यात येणार आहे. कृषी, पशुसंवर्धन,
मुंबई: केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एनएलएम) एक नवीन पशुधन विमा योजना लवकरच राज्यात लागू करण्यात येणार आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पूर, वीज पडणे, अपघात, विषबाधा आणि अनैसर्गिक मृत्यू यामुळे पशुधन गमावणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाची आधारभूत सुविधा उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली आर्थिक सुरक्षा मिळेल, ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी या योजनेला प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. यामध्ये विमा हप्त्याच्या ८५ टक्के रकमेचे योगदान केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे, तर लाभार्थी शेतकऱ्यांना केवळ १५ टक्के हप्ता भरावा लागणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे ‘ॲग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. (एआयसी)’ची निवड करण्यात आली आहे. विमा प्रीमियमचे दर १ वर्षासाठी ४.३० टक्के, २ वर्षांसाठी ७.५० टक्के आणि ३ वर्षांसाठी १०.५० टक्के निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक कुटुंबाला कमाल १० जनावरांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल. दुभत्या गायीसाठी ७० हजार रुपयांपर्यंत, दुभत्या म्हशीसाठी ८० हजार रुपयांपर्यंत, बैलांसाठी ७० हजार आणि रेड्यांसाठी ८० हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध असेल. शेळी आणि मेंढींसाठी प्रति जनावर ७ हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळेल.



















