Historic Meeting on Agriculture: कृषी भवनात ऐतिहासिक बैठक संपन्न

भारतीय कृषी क्षेत्राला पारंपरिक चौकटीतून बाहेर काढून जागतिक स्पर्धात्मकता, तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित अर्थव्यवस्थेशी जोडण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण बैठक
भारतीय कृषी क्षेत्राला पारंपरिक चौकटीतून बाहेर काढून जागतिक स्पर्धात्मकता, तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित अर्थव्यवस्थेशी जोडण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच कृषी भवन, नवी दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत किसान कोऑर्डिनेशन कमिटी (केसीसी) आणि विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत 'केसीसी'चे अध्यक्ष सरदार भूपिंदर सिंह मान यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शेतीच्या दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न, मुक्त बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, इथेनॉल, कृषी वित्त, फ्युचर्स मार्केट आणि भविष्यातील कृषी धोरण यावर व्यापक विचारमंथन झाले. विशेषतः इथेनॉल अर्थव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली, जिथे प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले की इथेनॉल हे केवळ ऊर्जा सुरक्षेसाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी एक प्रभावी साधन ठरू शकते. इथेनॉल उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि शेतकरी गटांना थेट सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली. यासाठी 'व्हाया शेतकरी इथेनॉल उत्पादन' हे राष्ट्रीय धोरण स्वीकारण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
बैठकीत जेनेटिक इंजिनिअरिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भारतीय शेतीला बायो-इकॉनॉमीकडे नेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रतिनिधींनी सांगितले की, आजच्या काळात चार एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला पारंपरिक शेतीवर अवलंबून राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे उच्च मूल्याची शेती उभारणे आवश्यक आहे, ज्यामुळे चार एकरातून चारशे एकरांच्या बरोबरीचे आर्थिक मूल्य निर्माण होईल. यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर करून भारतीय शेतीला उच्च मूल्याच्या उद्योगांशी जोडण्याची गरज आहे. फ्युचर्स मार्केटवरही चर्चा झाली, जिथे कृषिमंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांना फ्युचर्स मार्केटचे फायदे आणि किमतींचे जोखीम व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती देण्याची विनंती केली.



















