Typhoon Dolphin:जपानवर 'डॉल्फिन' वादळाचे संकट; भारताच्या मान्सूनवर काय होणार परिणाम?

जपानच्या डैटो आणि रियुक्यू बेटांच्या दिशेने 'डॉल्फिन' वादळ ताशी १७५ किलोमीटरच्या वेगाने सरकत आहे. भारतीय हवामानशास्त्रज्ञ या वादळाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेव
जपानच्या डैटो आणि रियुक्यू बेटांच्या दिशेने 'डॉल्फिन' वादळ ताशी १७५ किलोमीटरच्या वेगाने सरकत आहे. भारतीय हवामानशास्त्रज्ञ या वादळाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हे वादळ भारताच्या सीमेवर थेट धडकणार नसले तरी, पश्चिम पॅसिफिक महासागरात निर्माण झालेल्या या प्रचंड वादळामुळे भारतीय मान्सूनच्या पावसावर काही काळासाठी परिणाम होऊ शकतो, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. सुपर टायफून डॉल्फिन वादळ मिनामीदाईतो बेटाच्या पूर्व दिशेला सुमारे ५४० किलोमीटर अंतरावर केंद्रित असून, ते ताशी १७ किमी वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे. गेल्या आठवड्यात या वादळाने अनेकदा आपले रौद्ररूप धारण केले आहे. सध्या वादळात ताशी १७५ किमी वेगाने वारे वाहत असून, वाऱ्याचा वेग ताशी २१० किमीपर्यंत पोहोचत आहे. हे वादळ गुरुवारी डैटो बेटांजवळ पोहोचेल आणि शुक्रवारी त्याचा वेग मंदावून ओकिनावा बेटावर धडकेल. यामुळे रियुक्यू आणि अमामिया बेट समूहांमध्ये १० ते ११ मीटर उंच महाकाय लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच, तिथे १०० ते २०० मिमी आणि काही ठिकाणी ३५० मिमीपर्यंत अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, वादळ आणि भारतीय मान्सून यांच्यात उष्णता, आद्रता आणि वातावरणातील ऊर्जेसाठी स्पर्धा असते. पश्चिम उत्तर पॅसिफिक महासागरात एखादे शक्तिशाली वादळ तयार झाल्यावर, ते आसपासच्या प्रदेशातील सर्व आद्रता आणि ढग आपल्याकडे खेचून घेतात. यामुळे बंगालच्या उपसागरातील हवामान यंत्रणा कमजोर होते, कारण बंगालचा उपसागर भारतातील मध्य, पूर्व आणि उत्तर भागात पाऊस आणणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांचा मुख्य स्त्रोत आहे. वादळामुळे आद्रता कमी झाल्याने बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास अडथळा येतो. वादळामुळे पावसाला कारणीभूत ठरणारे वारे आणि ढगांची दिशा बदलते, ज्यामुळे भारतात काही दिवसांसाठी पावसाचा जोर कमी होऊ शकतो. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डॉल्फिन वादळामुळे भारतात दीर्घकाळ मान्सून थांबण्याची शक्यता कमी आहे. या वादळाचा प्रभाव किती काळ तीव्र राहतो आणि त्याचा पुढील प्रवास कसा होतो यावर अवलंबून असेल. सध्या भारतातील मान्सूनवर एल निनो, इंडियन ओशन डायपोल आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांची वारंवारता यांसारख्या जागतिक घटकांचा प्रभाव आहे. डॉल्फिन वादळामुळे बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली काही काळासाठी मंदावू शकते आणि भारतातील काही भागांत पावसाचा जोर तात्पुरता कमी होऊ शकतो. मात्र, हे वादळ जसे कमकुवत होईल तसा मान्सून पुन्हा एकदा वेग घेईल आणि देशभरात पाऊस पूर्ववत होईल, असा दिलासा तज्ज्ञांनी दिला आहे.












