Poland-India Friendship: पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाचा ऐतिहासिक कोल्हापूर दौरा

कोल्हापूर : शनिवारी पोलंडच्या उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळाचा कोल्हापूर दौरा होणार आहे, जो भारत आणि पोलंड यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक ठरणार आहे. दुसऱ्या
कोल्हापूर : शनिवारी पोलंडच्या उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळाचा कोल्हापूर दौरा होणार आहे, जो भारत आणि पोलंड यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक ठरणार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी आणि सोव्हिएत युनियनने पोलंडवर आक्रमण केल्यानंतर लाखो पोलिश नागरिकांना निर्वासित व्हावे लागले होते. त्या काळात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने १९४२ ते १९४८ दरम्यान ५,००० पोलिश निर्वासितांना आश्रय दिला होता. छत्रपती घराण्याच्या सहकार्यामुळे या निर्वासितांनी सन्मानाने जीवन जगले आणि वळीवडे येथे शाळा, चर्च, सांस्कृतिक केंद्रे आणि क्रीडांगणे उभारली. पोलिश संस्कृती जपून ठेवण्यासाठी भारताशी मैत्रीचे बंध पुढील पिढ्यांपर्यंत कायम राहिले आहेत.
युरोपमध्ये परतल्यानंतर अनेक पोलिश नागरिकांनी कोल्हापूरला आपले दुसरे घर मानले आहे. या ऐतिहासिक वारशाच्या स्मरणार्थ १९९८ मध्ये वस्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आणि २०१९ साली संभाजीराजे छत्रपती यांच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २०१९ मध्ये महाराष्ट्र शासन आणि पोलंड सरकारने वळीवडे येथे “म्युझियम ऑफ ह्युमॅनिटी अँड पीस” उभारण्याची घोषणा केली होती. कोविड-१९ महामारी आणि कोल्हापूरमधील पुरामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत विलंब झाला असला तरी, युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम पुढे सरकत राहिला आहे.



















