Unique Protest in Gadchiroli:गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गाला श्रद्धांजली, रखडलेल्या कामाविरोधात तरुणांचे अनोखे आंदोलन

गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३सीच्या दुरवस्थेच्या विरोधात काही तरुणांनी अनोखे आंदोलन केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून या महामार्गाचे काम अपूर्ण आहे,
गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३सीच्या दुरवस्थेच्या विरोधात काही तरुणांनी अनोखे आंदोलन केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून या महामार्गाचे काम अपूर्ण आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात, तरुणांनी ‘आधी रस्ता पूर्ण करा’ या मागणीसह महामार्गालाच श्रद्धांजली वाहिली. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून परिसरात चर्चा रंगली आहे. आष्टी–आलापल्ली–सिरोंचा हा सुमारे १४२ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेल्या सहा वर्षांपासून बांधकामाधीन आहे. आष्टी ते आलापल्ली या टप्प्यात काही प्रमाणात काम पूर्ण झाले असले तरी आलापल्ली–सिरोंचा या जवळपास १०० किलोमीटरच्या भागातील कामाची गती अत्यंत संथ आहे. परिणामी, प्रत्येक पावसाळ्यात हा मार्ग वाहतुकीसाठी वारंवार बंद पडत असून शेकडो गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात अवघ्या दोन महिन्यांत पाच ते सहा वेळा या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पुलांच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेले तात्पुरते वळणमार्ग पावसाच्या पाण्यात वारंवार वाहून जात असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. याच पार्श्वभूमीवर महामार्गालाच श्रद्धांजली वाहून तरुणांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. रखडलेल्या कामामुळे सर्वसामान्यांना दरवर्षी होणारा मनस्ताप थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रतीकात्मक आंदोलनामुळे एनएच-३५३सीच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



















