Kolhapur-Gokul Election: अवसायनातील दूध संस्थांची सुनावणी पूर्ण, निकालाकडे लक्ष

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या सभासद दूध संस्थांना सहायक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर यांनी अवसायनात काढले होते. याविरोधात १९३ दूध संस्थांनी कोल्हापूर सर्किट बेंच
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या सभासद दूध संस्थांना सहायक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर यांनी अवसायनात काढले होते. याविरोधात १९३ दूध संस्थांनी कोल्हापूर सर्किट बेंचकडे अपील केले होते. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, निकाल राखून ठेवला आहे. आता दूध संस्थांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. सहायक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर, कृष्णा ठाकरे यांनी ६४४ दूध संस्थांना अवसायनात काढले होते. त्यातील १९३ संस्थांनी न्यायालयात दाद मागितली होती. बुधवारी सुमारे दोन तास दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपले मुद्दे मांडले. सुनावणीचे कामकाज पूर्ण झाले असून, न्यायालयाकडून दोन दिवसांत निकाल मिळण्याची अपेक्षा आहे.
सहकार न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. ‘गोकुळ’च्या माजी संचालकांनी संघाचा पोटनियम झुगारून ४१० दूध संस्थांना सभासदत्व दिल्याबाबत वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी सहकार न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माजी संचालकांनी घेतलेल्या सभासदत्वाच्या निर्णयाला बेलवाडे यांनी आव्हान दिले आहे. बुधवारी या याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणावर सोमवारी (दि. १०) पुढील सुनावणी होणार आहे.
सहायक निबंधकांनी अवसायनाचे आदेश काढलेल्या ३०० संस्थांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे यांच्याकडे अपील केले आहे. या प्रकरणाची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीस मुदतवाढ देण्याबाबत विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे यांनी सर्वोच्च न्यायालयात विनंती केली आहे. या विनंतीवरही सोमवारी (दि. १०) सुनावणी होणार आहे. दूध संस्थांच्या या प्रकरणात न्यायालयाचे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यामुळे सर्व संबंधित पक्षांनी न्यायालयाचे निर्णय काय असतील याकडे लक्ष ठेवले आहे.



















