Heavy Rain Causes Damage:जळगाव जिल्ह्यातील जामदा डावा कालवा फुटला

जळगाव जिल्ह्यातील जामदा डावा कालवा नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या कालव्यातून पाणी सोडले जात असल्याने केवळ कालव्याचेच नु
जळगाव जिल्ह्यातील जामदा डावा कालवा नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या कालव्यातून पाणी सोडले जात असल्याने केवळ कालव्याचेच नुकसान झालेले नाही, तर जिल्ह्यातील नदीजोड व्यवस्थेवरही याचा गंभीर परिणाम झाला आहे. गिरणा नदीवर ब्रिटिशकालापासून अस्तित्वात असलेल्या या कालव्याची जलवाहन क्षमता सुमारे ५०० ते ६०० क्युसेक्स आहे. यामुळे चाळीसगाव, भडगाव, एरंडोल आणि पारोळा तालुक्यातील सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. या कालव्याचा विस्तार गिरणा धरणाच्या उभारणीच्या वेळी करण्यात आला होता, परंतु आता तो जीर्ण अवस्थेत आहे. दुष्काळी परिस्थितीत या कालव्यातून पाण्याचा प्रवाह अन्य धरणांमध्ये सोडला जातो, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होते. परंतु, कालव्याला भगदाड पडल्यामुळे याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कालव्याच्या जीर्ण अवस्थेमुळे या प्रकारच्या दुर्घटनांना आमंत्रण मिळत आहे. गेल्या दोन दशकांत हा कालवा तिसऱ्यांदा फुटला आहे. यापूर्वी २००६-०७ मध्ये सिंचनाच्या आवर्तनाच्या काळातही कालवा फुटला होता. यावेळी, शिवणी परिसरात ३१ जुलै रोजी कालव्याला पुन्हा भगदाड पडले. कालव्यावरील पूल, एस्केप, सायफन आणि सीआर गेट यांचे संपूर्ण नूतनीकरण न करता केवळ डागडुजी करण्यात आल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. यामुळे कालव्याची संरचना अधिक कमजोर झाली आहे. यंदा पाटबंधारे विभागाने कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी स्वच्छता का केली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कालव्यातील लोखंडी सीआर गेट सुरळीत कार्यरत नसल्याने पाण्याचा प्रवाह अडवला गेला आहे, ज्यामुळे कालव्याला भगदाड पडले.



















