Train Service Resumes:कोयंबतूर–जयपूर एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार

जळगाव : पश्चिम रेल्वेच्या जळगाव ते उधना मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गाडी क्रमांक ०६१८१/०६१८२ कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक
जळगाव : पश्चिम रेल्वेच्या जळगाव ते उधना मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गाडी क्रमांक ०६१८१/०६१८२ कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी एक्स्प्रेस १३ ऑगस्टपासून पुन्हा धावणार आहे. या गाडीचा धरणगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे, ज्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. धरणगाव स्थानकावर गाडी थांबवण्याची मागणी स्थानिक प्रवाशांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. धरणगाव तालुका प्रवासी मंडळानेही यासाठी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला. प्रवाशांची वाढती संख्या, राजस्थानकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांची गरज आणि दक्षिण भारताशी वाढणारा संपर्क लक्षात घेऊन ही मागणी सातत्याने लावून धरली जात होती. खासदार स्मिता वाघ यांनी देखील रेल्वे मंत्रालय आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे या मागणीला प्रभावीपणे मांडले आणि पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत विशेष एक्स्प्रेसला धरणगाव स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर केला.
गाडी क्रमांक ०६१८१ कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस प्रत्येक शुक्रवारी दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी धरणगाव स्थानकावरून जयपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. तर गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर–कोयंबतूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस प्रत्येक सोमवारी सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी धरणगाव स्थानकावर येऊन कोयंबतूरच्या दिशेने रवाना होईल. या दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक लक्षात घेता प्रवाशांना राजस्थानसह दक्षिण भारताकडे जाणे सोयीचे ठरणार आहे. धरणगाव स्थानकावरून जयपूरसह राजस्थानातील इतर शहरांकडे जाण्यासाठी उपलब्ध असणारी ही एकमेव थेट रेल्वे सेवा आहे. त्यामुळे प्रवाशांना जळगाव, भुसावळ किंवा इतर मोठ्या स्थानकांवर जाऊन रेल्वे बदलण्याची गरज राहणार नाही. राजस्थानमध्ये व्यवसाय, शिक्षण, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तामिळनाडू व दक्षिण भारतातील इतर शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ही रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.



















