Remarkable Surgery:महिलेच्या पोटातून १५ किलोचा मांसाचा गोळा काढला

बुलढाणा: एका महिलेच्या पोटात मोठ्या गाठीमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे तिच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण झाला होता. हिप जॉइंटमध्ये झालेल्या गुंतागुंती
बुलढाणा: एका महिलेच्या पोटात मोठ्या गाठीमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे तिच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण झाला होता. हिप जॉइंटमध्ये झालेल्या गुंतागुंतीच्या फॅक्चरमुळे ती पूर्णपणे अशक्त झाली होती. तिच्या पोटात १५.५ किलोग्रॅम वजनाची अंडाशयातील गाठ होती, जी तिच्या आतड्यांवर दबाव टाकत होती. या गंभीर परिस्थितीत, स्थानिक राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार केली. या शस्त्रक्रियेमध्ये महिलेच्या पोटातील गाठ, गर्भाशय आणि ओमेंटम यांना काढण्यात आले. शस्त्रक्रिया दोन तास चालली आणि त्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे आणि तिच्यावर २४ तास देखरेख ठेवली जात आहे. डॉक्टरांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे रुग्णाला नवजीवन मिळाले आहे.
महिलेला काही महिन्यांपासून गंभीर आजारांनी ग्रासले होते. हिप जॉइंटच्या फॅक्चरमुळे ती अंथरुणावर खिळली होती. पोटातील गाठांमुळे तिच्या आतड्यांवर दबाव येत होता, ज्यामुळे तिला अन्न घेणे आणि पचन करणे अशक्य झाले होते. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते, कारण भूल देण्यापासून शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्पा जोखमीचा होता. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शल्यचिकित्सक डॉ. निखिल नलावडे, डॉ. गौरव गायकवाड, डॉ. किशोर वानखेडे आणि डॉ. शुभम पवार यांनी या शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. भूल व्यवस्थापनाची जबाबदारी डॉ. सुवर्णा काटकर यांनी यशस्वीपणे सांभाळली.



















