AI Impact on Jobs: नंदन निलेकणींचा मोठा दावा, लहान व्यवसायांमध्ये रोजगार वाढणार

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा प्रभाव विविध उद्योगांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः आयटी क्षेत्रात, जिथे एकेकाळी उच्च पगार आणि आकर्षक सोयी-सुविधा मिळत
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा प्रभाव विविध उद्योगांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः आयटी क्षेत्रात, जिथे एकेकाळी उच्च पगार आणि आकर्षक सोयी-सुविधा मिळत होत्या, तिथे सध्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी होत आहेत. तथापि, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांचे म्हणणे आहे की, भविष्यात देशातील लहान व्यवसाय हे रोजगार निर्मितीचे मुख्य केंद्र बनतील. त्यांनी याबाबत ‘नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च’च्या एका कार्यक्रमात चर्चा केली. त्यांचे मत आहे की, लहान व्यवसायांमध्ये एकाच व्यक्तीला अनेक कामे करावी लागतात, ज्यामुळे एआयमुळे नोकऱ्या कमी होण्याचा धोका कमी आहे. याउलट, मोठ्या कंपन्या एआय तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याने तिथे नोकऱ्या कमी होण्याची शक्यता अधिक आहे.
निलेकणी यांनी स्पष्ट केले की, मोठ्या कंपन्यांची रचना अत्यंत शिस्तबद्ध असते आणि तिथे प्रत्येक कामाचे विभाजन केले जाते. त्यामुळे, भविष्यात रुटीन कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जागा एआय घेऊ शकते. सध्या एआय एक महागडे तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे लहान आणि कमी भांडवल असलेल्या कंपन्या ते लगेच स्वीकारू शकत नाहीत. त्यांनी यावर जोर दिला की, लहान व्यवसायांमध्ये एआयच्या वापरामुळे रोजगाराची संधी कमी होणार नाही. यामुळे, लहान व्यवसाय हे रोजगार निर्मितीचे खरे केंद्र बनतील, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, त्यांनी भारताच्या एआय स्पर्धेत मागे राहण्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारताने एआयच्या प्रत्यक्ष वापरावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे सांगितले.



















