Acid Attack Survivor's Inspiring Journey:रेशम फातमाची यशस्वी कहाणी

जेव्हा एखाद्या तरुणीवर ॲसिड हल्ला होतो, तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. विद्रूप चेहरा घेऊन जगण्याची कडवी जाणीव, लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा आणि मानसिक ख
जेव्हा एखाद्या तरुणीवर ॲसिड हल्ला होतो, तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. विद्रूप चेहरा घेऊन जगण्याची कडवी जाणीव, लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा आणि मानसिक खच्चीकरण यांसारख्या अनेक आव्हानांना तोंड देताना रेशम फातमा या तरुणीने आपल्या धैर्याने आणि शिक्षणाच्या जोरावर एक प्रेरणादायी कथा रचली आहे. रेशमचा जन्म जमशेदपूरमध्ये एका सामान्य मुस्लिम कुटुंबात झाला. दहावीच्या शिक्षणानंतर ती लखनऊमध्ये आपल्या आजोळी राहू लागली. तिथेच तिच्या आईच्या चुलतभाऊने तिला लग्नाची मागणी केली, परंतु रेशमने शिक्षणाला प्राधान्य देत नकार दिला. या नकारामुळे त्याने तिला महाविद्यालयात सोडण्याचा बहाणा करून हल्ला केला आणि तिच्या डोक्यावर ॲसिड ओतले. या घटनेने तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण तिने हार मानली नाही. तिने शस्त्रक्रियांच्या कठीण काळातही शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आणि बारावीमध्ये ८७% गुण मिळवले. पुढे तिने भौतिकशास्त्र विषय घेऊन पदवी पूर्ण केली.
रेशमने २०२३ मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर्स करण्याचा निर्णय घेतला. तिथे तिने ई-बर्थ फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली, जिथे मुस्लिम तरुणींना शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्याबाबत मार्गदर्शन केले जाते. २०१५ मध्ये तिला प्रजास्ताक दिनी मुलांसाठी दिला जाणारा 'भारत पुरस्कार' मिळाला, जो तिच्या धैर्याचे प्रतीक आहे. या पुरस्काराच्या काही दिवस आधी तिच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने तुरुंगात आत्महत्या केली. रेशमने या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, त्याने यशस्वी होत असल्याचे पाहण्यासाठी जिवंत राहायला हवे होते. यावरून तिच्या शिक्षणाने तिच्यात किती मोठा बदल घडवून आणला हे स्पष्ट होते.











