Changes in Railway Law:महिला लोकल डब्यात पुरुषांनी घुसखोरी केल्यास २,५०० रुपयांपर्यंत दंड

मुंबई शहरात रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि नियमबद्ध करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारित नियमांनुस
मुंबई शहरात रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि नियमबद्ध करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारित नियमांनुसार, महिला राखीव डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या पुरुष प्रवाशांना आता २,५०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबतची माहिती दिली असून, यामुळे रेल्वे प्रवासात शिस्त आणि सुरक्षा वाढेल, असे सांगितले आहे. यापूर्वी, कलम १६२ अन्वये पुरुषांना महिला राखीव डब्यात प्रवेश केल्यास ५०० रुपयांपर्यंत दंड आणि तिकीट जप्त करण्याची तरतूद होती. आता या नियमात सुधारणा करून दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना अधिक गंभीरतेने नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त केले जाईल.
दोषी व्यक्तीने दंड भरण्यास नकार दिल्यास त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. न्यायालयाने अशा व्यक्तीला ५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठवू शकतो. या सुधारित नियमांमध्ये तृतीयपंथी व्यक्तींविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही, हे विशेषतः नमूद करण्यात आले आहे. अनधिकृत प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये बेकायदा प्रवेश, तसेच महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी राखीव जागांवर अतिक्रमण यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि राखीव जागांचा आदर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. या सुधारणांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



















