Voter Registration Announcement:मतदारयादीत नाव नसलेल्यांना २४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार

मुंबई: राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे जमा करणे आवश
मुंबई: राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे जमा करणे आवश्यक आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी स्पष्ट केले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, गणना अर्ज भरून स्वाक्षरी केलेल्या मतदारांची नावे २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जातील. यामुळे मतदारांना त्यांच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली माहिती वेळेत सादर करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये मतदारांनी त्यांच्या सध्याच्या निवासस्थानानुसारच अर्ज भरावा, कारण एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवता येणार नाही. त्यामुळे, ज्या मतदारांची नावे एकाहून अधिक ठिकाणी आहेत, त्यांनी त्यांच्या सध्याच्या ठिकाणासाठीच अर्ज सादर करावा, अन्यथा इतर ठिकाणच्या अर्जावर ‘आधीच नोंदणीकृत’ अशी नोंद केली जाईल आणि त्या ठिकाणी नाव समाविष्ट केले जाणार नाही, असे मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
प्रारूप मतदार यादीत पात्र असूनही नाव नसलेल्या किंवा नव्याने मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत नमुना क्र. ६ भरून नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध असेल. याशिवाय, नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ आणि नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७ सादर करता येईल. या नवीन अर्जांसाठी आवश्यक घोषणापत्र आणि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर, योग्यतेची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली जातील. यामध्ये खोटी माहिती देऊन नाव समाविष्ट करण्याचा किंवा दुरुस्तीचा प्रयत्न केल्यास एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याचा इशारा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.



















