Power Theft Crackdown:शहापूर, मुरबाड तालुक्यांत महावितरणचा वीज चोरांना दणका

कल्याण : महावितरणच्या कल्याण मंडळ-२ ने शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील विविध गावांमध्ये वीज चोरीच्या प्रकरणांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले. या मोहिम
कल्याण : महावितरणच्या कल्याण मंडळ-२ ने शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील विविध गावांमध्ये वीज चोरीच्या प्रकरणांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले. या मोहिमेत ८२ वीज चोरीच्या प्रकरणांचा उलगडा करण्यात आला, ज्यामुळे १३ लाख रुपयांच्या वीज देयकाचे मूल्यांकन करण्यात आले. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या परिसरात वीज चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकांची स्थापना करण्यात आली. या मोहिमेत १९ अभियंते, १८ लेखा कर्मचारी आणि ४५ जनमित्रांनी सहभाग घेतला, ज्यामुळे वीज चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात मदत झाली. मोहिमेदरम्यान ८०० हून अधिक वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली आणि अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. अचानक कारवाईमुळे वीज चोरांना बचाव करण्याची संधी मिळाली नाही आणि अनेक वीज चोरीच्या प्रकरणांना महावितरणच्या पथकाने जागीच पकडले. या तपासणीदरम्यान ८२ वीज चोरीच्या प्रकरणांची नोंद झाली, ज्यामध्ये एकूण ७२ हजार ४३८ वीज युनिट वीज चोरी झाल्याचे आढळून आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये ग्राहकांविरुद्ध वीज अधिनियम, २००३ अंतर्गत दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येईल. थकीत दंड आणि वीज देयकाची रक्कम वेळेत न भरल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. महावितरणने शहापूर आणि मुरबाड परिसरात वीज चोरी शोधण्याची मोहिम पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.



















