Cyber Fraud Alert:कमिशनच्या लालसेने संकटात!

रेवणअप्पा साळेगावकरसेलू (जि. परभणी): सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील भामट्यांना किंवा अज्ञात व्यक्तींना थोडेफार कमिशन मिळवण्यासाठी आपले बँक खाते वापरू देणे सेलू श
रेवणअप्पा साळेगावकरसेलू (जि. परभणी): सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील भामट्यांना किंवा अज्ञात व्यक्तींना थोडेफार कमिशन मिळवण्यासाठी आपले बँक खाते वापरू देणे सेलू शहरातील एका व्यावसायिकाला भलतेच महागात पडले आहे. मुंबई येथील एका गंभीर सायबर गुन्ह्याचे धागेदोरे सेलू शहरापर्यंत पोहोचले असून, या बेकायदेशीर प्रकारात मदत करणाऱ्या व्यापाऱ्यावर सेलू पोलीस ठाण्यात पहिलाच गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे सेलूतील व्यापारी व नागरी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सुजाराम बगाराम चौधरी (मूळ रा. दुधवा, ता. जालोर, राजस्थान; सध्या रा. सेलू) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. खाजगी बँकेतील खात्यातून ९९ हजारांचा संशयास्पद व्यवहार मुंबई येथील सायबर फसवणुकीच्या एका प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना त्याचे कनेक्शन सेलूपर्यंत आले होते. परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या गोपनीय सूचनेनुसार सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुजाराम चौधरी याच्या खाजगी बँकेतील खात्याची सखोल चौकशी केली. चौकशीत २१ जानेवारी २०२६ रोजी सायबर फसवणुकीतून आलेली ९९ हजार रुपयांची बेकायदेशीर रक्कम चौधरी याने स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारून ते खाते बेकायदेशीर व्यवहारांसाठी वापरू दिल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक वैभव नागे यांची फिर्याद हा गंभीर आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार उघडकीस आल्यानंतर शासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक वैभव नागे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री (५ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या रॅकेटमध्ये शहरातील आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. हे देखील वाचा: पाथरी येथे ऑनलाईन हॅकिंगद्वारे एका कष्टकरी ऑटो चालकाच्या बँक खात्यातून १ लाख ९६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 'म्युल अकाऊंट'चा वाढता धोका; पोलीस निरीक्षकांचे आवाहन ऑनलाइन फसवणुकीतील बेकायदेशीर रक्कम स्वतःच्या खात्यात स्वीकारणे किंवा ती पुढे वळवणे, या प्रकाराला 'म्युल अकाऊंट' (Mule Account) म्हटले जाते. अशा खात्याचा वापर झाल्याने सुजाराम चौधरीवर कारवाई झाली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "कोणाकडूनही ऑनलाईन पैसे स्वीकारताना ते फसवणुकीचे तर नाहीत ना? याची शहानिशा करा. थोड्याशा आर्थिक फायद्यासाठी किंवा कमिशनसाठी कोणीही आपले बँक खाते दुसऱ्या व्यक्तीला वापरू देऊ नये, अन्यथा थेट गुन्हेगारी कारवाईला सामोरे जावे लागेल," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.



















