Cyber Theft in Pathri:ऑटो चालकाची १ लाख ९६ हजारांची लूट

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एका ऑटो चालकाच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी मोबाईल हॅक करून १ लाख ९६ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एका ऑटो चालकाच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी मोबाईल हॅक करून १ लाख ९६ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नारायण पिराजी सावळे या ऑटो चालकाने ४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आपल्या मोबाईलचा वापर करत असताना अचानक तो हॅक झाला. पाच मिनिटांच्या आत मोबाईल पुन्हा सुरळीत झाला, परंतु त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे त्याला समजले. त्याने रात्री घरी आल्यावर बँक खात्यातील व्यवहार तपासले असता, ४ ऑगस्ट रोजी दुपारी ३:०६ वाजता ९८ हजार रुपये एका अनोळखी UPI आयडीवर वळवले गेले होते. याबाबत त्याला कोणताही मेसेज प्राप्त झाला नव्हता, ज्यामुळे त्याला या लुटीची माहिती उशिरा मिळाली.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे ५ ऑगस्ट रोजी, पुन्हा एकदा त्याच्या खात्यातून ९८ हजार रुपये कमी झाल्याचे त्याला समजले. त्या दिवशी दुपारी ३:३४ वाजता त्याला बँकेकडून मेसेज आला की, त्याच्या खात्यातून पुन्हा ९८ हजार रुपये काढण्यात आले आहेत. या दोन घटनांमुळे एकूण १ लाख ९६ हजार रुपये त्याच्या खात्यातून गायब झाले. सावळे यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून आपले खाते ब्लॉक केले आणि त्यानंतर त्यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


















