Disturbing Incident on Flight:कोच्ची विमानात प्रवाशाचा धक्कादायक कृत्य

क्वालालंपूरहून कोच्चीच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या बाटिक एअरच्या विमानात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून केरळमधील कोच्ची ये
क्वालालंपूरहून कोच्चीच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या बाटिक एअरच्या विमानात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून केरळमधील कोच्ची येथे येणाऱ्या या विमानात एका प्रवाशाने उड्डाणादरम्यान इमर्जन्सी एक्झिट विंडो पॅनेलवर जोरात लाथ मारून तोडले. या घटनेमुळे विमानात एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या ३६ वर्षीय प्रवाशाने मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला. मात्र, विमानातील कर्मचाऱ्यांनी आणि इतर प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत त्याला वेळेत पकडल्याने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची माहिती नेडुम्बसेरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीतून समजली. बुधवारी रात्री ९.३० ते ११.०५ या वेळेत ही घटना घडली. बाटिक एअरच्या OD231 या विमानात १२A क्रमांकाच्या आसनावर बसलेल्या जमशीर नावाच्या प्रवाशाने अचानक विचित्र वर्तन सुरू केले. उड्डाणादरम्यान त्याने अचानक जोरात लाथ मारून खिडकीचे पॅनेल फोडले आणि मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. हवेत असलेल्या विमानाचा दरवाजा उघडल्यास सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो, याची त्याला जाणीव असतानाही तो हे कृत्य करत होता.
विमानातील कर्मचाऱ्यांनी आणि इतर प्रवाशांनी तात्काळ त्याला रोखण्यासाठी धाव घेतली. मात्र, आरोपीने त्यांना धक्का मारून शिवीगाळ केली आणि धमकावण्यास सुरुवात केली, ज्यामुळे विमानात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर, कसाबसा प्रयत्न करून त्याला पकडून ठेवण्यात आले आणि दरवाजापासून दूर खेचले गेले. विमान कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरताच, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी आरोपीला ताब्यात घेतले. जमशीर अथानिक्कल असे या आरोपीचे नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत त्याला अटक केली. बाटिक एअरच्या सुरक्षा प्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















