Pune Police Directive: पुणे पोलिस आयुक्तांचा आरोपींच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्याचा आदेश

पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अल्पवयीन आरोपींची धिंड काढण्याच्या घटनेमुळे पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाची दखल मानवाधिकार आयोगाने घ
पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अल्पवयीन आरोपींची धिंड काढण्याच्या घटनेमुळे पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी आरोपींची धिंड काढणे आणि सार्वजनिक अपमान थांबवण्याचे आदेश दिले आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना, शाखांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात आरोपींच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या परिपत्रकात सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या विविध आदेशांचा संदर्भ दिला आहे. अलीकडच्या काळात काही पोलीस ठाण्यांमध्ये अटक केलेल्या आरोपींना अपमानास्पद वागणूक दिल्याचे व्हिडीओ समोर आले होते, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा धूमिल झाली आहे आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुन्हा मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
पोलिस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना पुढील सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही आरोपीची धिंड काढू नये किंवा सार्वजनिक अपमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये. आरोपीला अपमानास्पद वागणूक देणे, जसे की उठाबशा काढायला लावणे किंवा दोरीने बांधणे, हे सर्व निषिद्ध आहे. आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या नियमांनुसारच करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची आणि आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.


















