BJP's National Leaders Focus on Voter List:पूर्व विदर्भातील एसआयआरवर भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बारीक नजर

नागपूर: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. या एसआयआर मोहिमेचा
नागपूर: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. या एसआयआर मोहिमेचा उद्देश संघटनेची ताकद तपासणे आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करणे हा आहे. राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी नागपुरात येऊन पूर्व विदर्भातील एकूण स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी काही जिल्ह्यांमध्ये एसआयआरच्या अपेक्षित नोंदणी का झालेली नाही याबाबत विचारणा केली. मतदारांना तांत्रिक मार्गदर्शन करून अधिक समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी लक्ष्मीनगर परिसरात पूर्व विदर्भाची संघटनात्मक बैठक झाली. या बैठकीत संबंधित जिल्ह्यांचे नेते, अध्यक्ष आणि महामंत्री उपस्थित होते. ही बैठक एसआयआरपुरती मर्यादित नव्हती, तर पूर्व विदर्भातील भाजपच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष, महामंत्री आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय किती आहे, प्रदेशाकडून दिलेले कार्यक्रम प्रत्यक्षात राबविले जात आहेत का, कार्यकर्त्यांचा बूथ पातळीवरील संपर्क किती मजबूत आहे, यावर चर्चा झाली. एसआयआरसाठी पक्षाने निश्चित केलेल्या लक्ष्याच्या तुलनेत काही जिल्ह्यांत अपेक्षित प्रगती झालेली नसल्याचे बैठकीत समोर आले. यावर शिवप्रकाश यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी आल्या का, स्थानिक संघटनेने काय उपाययोजना केल्या आणि उर्वरित कालावधीत लक्ष्य पूर्ण करण्यासाठी काय नियोजन आहे, याबाबत थेट प्रश्न विचारले. एसआयआर ही केवळ मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया नसून, कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्याशी समन्वय साधावा आणि जनतेशी संवाद वाढवावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि महामंत्र्यांमधील समन्वयावर विशेष भर देण्यात आला. निर्णय प्रक्रियेत सर्व पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, अध्यक्ष आणि महामंत्री नियमित संवाद साधतात का, जिल्हास्तरावर संघटनात्मक वातावरण कसे आहे, याबाबत स्वतंत्रपणे माहिती घेण्यात आली. काही जिल्ह्यांतील अंतर्गत समन्वयातील उणिवाही या चर्चेदरम्यान समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. संघटनात्मक स्थितीची माहिती केवळ अध्यक्षांकडून न घेता इतर पदाधिकाऱ्यांची मतेही जाणून घेण्यात आली. प्रदेश नेतृत्वाकडून देण्यात येणारे कार्यक्रम केवळ अहवालांपुरते मर्यादित न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी बूथ पातळीपर्यंत झाली पाहिजे, यावरही बैठकीत भर देण्यात आला. जिल्हा, मंडल आणि बूथ स्तरावरील संपर्क यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.



















