NCP Protest: जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक निषेध

जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या 'गुंगी गुडीया' या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा
जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या 'गुंगी गुडीया' या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेस भवनासमोर झालेल्या या आंदोलनात अवघ्या दोन महिलांनी भाग घेतला, ज्यामुळे आंदोलनाच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तथापि, पुरुष कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसरात एक वेगळाच उत्साह निर्माण केला. 'महिला विरोधी काँग्रेसचा धिक्कार असो', 'हर्षवर्धन सपकाळ माफी मागा', 'काँग्रेसचा निषेध असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काळा पोशाख परिधान करून आपला रोष व्यक्त केला आणि डोक्यावर काळी पट्टी बांधली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनात माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे, योगेश देसले, अरविंद मानकरी, पुरुषोत्तम चौधरी, अभिलाषा रोकडे आणि विनोद देशमुख यांसारख्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. संजय पवार यांनी सुनेत्रा पवार यांना झालेल्या दुःखाबद्दल भाष्य करत, 'सपकाळांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे, त्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे,' अशी मागणी केली.
दुसरीकडे, काँग्रेसचे पदाधिकारी या आंदोलनात शांतपणे उभे होते, गळ्यात पक्षाचे पट्टे घालून त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. आंदोलन संपल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पाण्याचे बॉटल आणि गुलाबाचे फूल देऊन एक अनोखी 'गांधीगिरी' दाखवली. काँग्रेसचे शहर महानगराध्यक्ष जमील शेख यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, 'आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही आमची संस्कृती आहे,' म्हणून त्यांनी त्यांना पाणी आणि फुले दिली. यावरून स्पष्ट होते की, काँग्रेसने या आंदोलनाला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तवात, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाऐवजी अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि एफआयआर दाखल व्हावा यासाठी रस्त्यावर उतरायला हवे होते.



















