Major Action in Jalgaon Bypass Case: गडकरींकडून दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश!

जळगाव : सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या भरावाचा काही भाग खचल्याच्या गंभीर घटनेची दखल अखेर केंद्रीय स्तरावर घ
जळगाव : सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या भरावाचा काही भाग खचल्याच्या गंभीर घटनेची दखल अखेर केंद्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत दोषी आढळणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण या प्रकारामुळे त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्याची घटना घडल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. यानंतर खासदार वाघ यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत गडकरी यांनी तत्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. चौकशीत दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यासह संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचाही मुद्दा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर मांडला. शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौफुली तसेच नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्गावर उड्डाणपूल किंवा व्हेईक्युलर अंडरपास उभारण्याची मागणी त्यांनी केली. खासदार वाघ यांनी मांडलेल्या प्रस्तावांना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून या कामांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रकल्पांमुळे जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यास तसेच नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा यापुढेही सुरू राहील. निकृष्ट दर्जाची कामे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत आणि जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे, असे खासदार वाघ म्हणाल्या. दरम्यान, बायपासवरील दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही नुकतीच घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली होती.



















