Court Denies Bail to BJP Corporator: भाजप नगरसेवक आकाश राज पुरोहित यांना न्यायालयीन कोठडी जामीन अर्ज फेटाळला

मुंबईतील बेस्टच्या महाव्यवस्थापक कार्यालयात घुसून २०२० मध्ये आंदोलन करणाऱ्या भाजप नगरसेवक आकाश राज पुरोहित यांना सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुंबईतील बेस्टच्या महाव्यवस्थापक कार्यालयात घुसून २०२० मध्ये आंदोलन करणाऱ्या भाजप नगरसेवक आकाश राज पुरोहित यांना सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामीन अर्जाला न्यायालयाने फेटाळून लावले आहे. विशेष सत्र न्यायालयाने हा निर्णय घेतला असून, सुनावणीच्या वेळी वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे हा आदेश देण्यात आला आहे. आकाश राज पुरोहित यांच्यासह अन्य भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि माजी आमदार अतुल शहा यांचा समावेश आहे. बेस्ट प्रशासनाने ग्राहकांना पाठवलेल्या भरमसाठ बिले याविरोधात भाजपने आंदोलन केले होते, ज्यात त्यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बुधवारी न्यायालयात सुनावणी सुरू असताना, काही आरोपी न्यायालयात उशिरा पोहोचले. न्यायाधीशांनी राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना वगळून इतर आरोपींविरुद्ध वॉरंट जारी केले. उर्वरित नेते न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना दंड आकारून सोडून देण्यात आले. मात्र, आकाश राज पुरोहित हे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात यापूर्वीच वॉरंट जारी करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना थेट न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला आहे. आकाश राज पुरोहित यांना ११ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.



















