Heavy Rain Impact in Bhor:भोरमध्ये अतिवृष्टीचा भातशेतीला मोठा फटका

भोर तालुक्यात जुलै महिन्याच्या प्रारंभात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीला मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे ४४३ शेतकऱ्यांच्या १२३.३८ हेक्टर क्षेत्रातील भात रोपे
भोर तालुक्यात जुलै महिन्याच्या प्रारंभात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीला मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे ४४३ शेतकऱ्यांच्या १२३.३८ हेक्टर क्षेत्रातील भात रोपे आणि १ हजार ४३६ शेतकऱ्यांच्या २५८.२७ हेक्टर शेतजमिनी बाधित झाल्या आहेत. कृषी विभागाने या नुकसानीसाठी एकूण १ कोटी ३३ लाख ६३ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. भातशेतीच्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत गंभीर परिणाम झाला आहे, ज्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे.
भोर तालुक्यातील वेळवंड, भूतोंडे, हिडोशी आणि महुडे खोऱ्यात १ ते ८ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे भात रोपे आणि तालींचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ताली फुटल्याने आणि वाहून गेल्याने शेतांमध्ये माती, दगड आणि गोटे साचले आहेत. काही ठिकाणी सुपीक मातीच खरडून गेल्याने शेती बाधित झाली आहे. कृषी विभागाने या आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
भोर तालुक्यात खरीप हंगामात सुमारे ७ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. डोंगरी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी भात हे प्रमुख पीक आहे, त्यामुळे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. नुकसानभरपाईची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी जोर धरत आहे. नियमांनुसार भात रोपांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ८ हजार ५०० रुपये, तर ताली फुटल्याने बाधित झालेल्या शेतजमिनीसाठी प्रतिहेक्टर ४७ हजार रुपये इतकी मदत देण्याची तरतूद आहे.
अतिवृष्टीमुळे भात रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक भागांत रोपांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे भात लागवडीला विलंब झाला असून, याचा परिणाम पिकाच्या वाढीवर झाला आहे. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास उत्पादनातही मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नुकसानग्रस्त भागातील भात रोपे व शेतजमिनीचे पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच नुकसानभरपाईची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी सांगितले.





















