Halad Cultivation: शेतकऱ्यांचा हळदीकडे 'टर्न'; चिखलीत लागवड क्षेत्रात तब्बल १९ पट वाढ!

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमुळे पारंपरिक पिकांवरून पर्यायी नगदी पिकांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात मसालेवर
चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमुळे पारंपरिक पिकांवरून पर्यायी नगदी पिकांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात मसालेवर्गीय हळद आणि अद्रकाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी ७१.१९ हेक्टरवर असलेले हळदीचे क्षेत्र यंदा १,३५० हेक्टरवर पोहोचले आहे, म्हणजेच हळद लागवडीच्या क्षेत्रात १९ पट वाढ झाली आहे. अद्रकाच्या बाबतीतही यंदा २५० हेक्टरवर लागवड झाली आहे, जी गतवर्षीच्या १४ हेक्टरवरून मोठी वाढ दर्शवते. चिखली तालुक्यात पारंपरिक सोयाबीनसह इतर पिकांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी मसालेवर्गीय पिकांची लागवड एक नवी क्रांती ठरली आहे. यंदा चिखली तालुक्यात एकूण ८९,८५७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. सोयाबीन हे पारंपरिक पीक असले तरी, हवामानातील बदल, उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता भासली आहे. त्यामुळे हळद आणि अद्रकासारख्या मसालेवर्गीय पिकांना यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
हळद लागवडीला चालना मिळण्यामागे बाजारपेठेची उपलब्धता हे एक प्रमुख कारण आहे. हळदीला देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेत सातत्याने मागणी असते. गेल्या काही वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीला मिळालेला चांगला भाव आणि मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी-विक्रीची सुविधा यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेचा विश्वास मिळाला आहे. याशिवाय परिसरातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि प्रक्रिया उद्योगामुळे हळद उत्पादकांसाठी विक्रीची संधी वाढली आहे. त्यामुळे उत्पादन केल्यानंतर बाजारपेठ मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. पारंपरिक पिकांच्या अर्थकारणात अडचणी आल्यामुळे शेतकरी आता पीक विविधीकरणाचा मार्ग स्वीकारत आहेत. सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांसोबत हळद आणि अद्रक यांसारख्या नगदी पिकांची लागवड करून उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.





















