Farmers' Unity in Gadchiroli:गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे प्रशासन नमले; सातही जणांवरील गुन्हे मागे

गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक येथे पोलाद प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी विनापरवाना ड्रोन उडविणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण
गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक येथे पोलाद प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी विनापरवाना ड्रोन उडविणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याने ७ ऑगस्ट रोजी हजारो शेतकरी आष्टीत एकत्र आले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी सुमारे अकरा तास ठिय्या व रास्ता रोको करून प्रशासनावर दबाव टाकला. अखेर, प्रशासनाने नमते घेत सात शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली, ज्यामुळे मध्यरात्री आंदोलन स्थगित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या एकजुटीने प्रशासनाला यशस्वीपणे मागे हटवले.
मुधोली चक येथे ९ जुलै रोजी 'वरद फेरो'च्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले. यावेळी शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना थांबवून त्यांच्याशी संवाद साधला. पोलिसांनी मध्यस्थी करून काही शेतकऱ्यांची सुटका केली, परंतु यानंतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून ३० ते ४० अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. ७ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली.
मुधोलीसह परिसरातील १३ गावांतील हजारो शेतकऱ्यांनी आष्टी पोलिस ठाण्यात धडक देत ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी गुन्हे तत्काळ मागे घेण्याची मागणी केली, अन्यथा सर्वांनाच अटक करावी, अशी भूमिका घेतली. तोडगा न निघाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता सुरु झालेल्या आंदोलनामुळे अहेरी, चामोर्शी व चंद्रपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे. यांनी मध्यरात्री शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि पुराव्यांच्या अभावामुळे गुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले आणि मध्यरात्री १२ वाजेपासून वाहतूक पूर्ववत सुरु झाली.





















