Tamil Nadu and Kerala's Stance on Vande Mataram: तामिळनाडू-केरळने ‘वंदे मातरम्’ बाबत वेगळी भूमिका का घेतली?

केंद्र सरकारने २८ जानेवारी २०२६ रोजी ‘वंदे मातरम्’च्या गायनाबाबत एक नवा प्रोटोकॉल जारी केला आहे. या प्रोटोकॉलनुसार, राष्ट्रीय गीताची अधिकृत सहा कडव्यांची पूर्ण
केंद्र सरकारने २८ जानेवारी २०२६ रोजी ‘वंदे मातरम्’च्या गायनाबाबत एक नवा प्रोटोकॉल जारी केला आहे. या प्रोटोकॉलनुसार, राष्ट्रीय गीताची अधिकृत सहा कडव्यांची पूर्ण आवृत्ती गायली किंवा वाजवली जाणार आहे, ज्याचा कालावधी सुमारे ३ मिनिटे १० सेकंद आहे. शासकीय कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीत दोन्ही असतील, तर ‘वंदे मातरम्’ आधी आणि ‘जन गण मन’ नंतर सादर केले जाईल. राष्ट्रपतींच्या स्वागत समारंभात, ध्वजारोहण आणि राज्यपाल किंवा नायब राज्यपालांच्या औपचारिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय गीताची अधिकृत आवृत्ती गायली जाणार आहे. तथापि, दक्षिण भारतातील राज्यांनी या आदेशाला आव्हान दिले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी शासकीय कार्यक्रमांत राज्यगीत आधी गायले जाईल, असा ठराव संमत केला आहे, तर केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी ‘वंदे मातरम्’ची सर्व कडवी गायली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. पण, केरळचे आरोग्य मंत्री के मुरलीधरन यांनी स्पष्ट केले की, केरळमध्ये राष्ट्रीय गीताची फक्त दोन कडवी गायली जाणार. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे दक्षिणी राज्यांमध्ये पुन्हा एकदा केंद्र सरकारविरुद्ध वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी १० ऑगस्ट रोजी विधानसभेत एक ठराव मांडला, ज्यामध्ये शासकीय कार्यक्रमांच्या सुरुवातीला ‘तमिळ थाई वाझ्थू’ हे राज्यगीत गायले जाईल, अशी मागणी करण्यात आली. १९७० पासून सुरू असलेली ही परंपरा कायम ठेवण्याचे आश्वासन या ठरावातून देण्यात आले आहे. विजय यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले की, “तमिळ ही आमची भावना आणि ओळख आहे.” त्यांनी असेही सांगितले की, मातृभाषेचा अभिमान ठेवणे आवश्यक आहे, कारण ती आमच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यक्रमांमध्ये ‘तमिळ थाई वाझ्थू’ गायले जाईल, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.





















