Action against Ashram School:जपतलाई आश्रमशाळेवर कारवाई; मान्यताच रद्द !

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत झालेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजवली आहे. या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनीं
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत झालेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजवली आहे. या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ११ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनीही या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तिन्ही विद्यार्थिनींचा अंत्यसंस्कार १० ऑगस्ट रोजी त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात करण्यात आला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आश्रमशाळेत आदिवासी दिनाच्या रात्री झोपलेल्या सहा विद्यार्थिनींवर सर्पदंश झाला. यामध्ये सुश्मिता सरोजित मंडल (वय १४), दीपिका एतवा लकड़ा (वय १२), अनु गजुराम कोरेटी (वय ८) या विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपिका मडावी (वय ११) हिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत, तर समृद्धी नैताम (वय १४) आणि कविता किरंगा (वय १२) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर दखल घेतली असून, शाळेत शिक्षक आणि वॉर्डन नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.




















