Road construction issues in Nashik:नाशिकमध्ये रस्त्याच्या कामांवर प्रश्नचिन्ह

नाशिक – शहरातील सीबीएस ते कॅनडा कॉर्नरदरम्यान नव्याने काँक्रिटीकरण झालेला रस्ता अवघ्या चार महिन्यांत स्मार्ट सिटी कंपनीच्या कामासाठी पुन्हा फोडला जात असल्याचा प
नाशिक – शहरातील सीबीएस ते कॅनडा कॉर्नरदरम्यान नव्याने काँक्रिटीकरण झालेला रस्ता अवघ्या चार महिन्यांत स्मार्ट सिटी कंपनीच्या कामासाठी पुन्हा फोडला जात असल्याचा प्रकार नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी उघड केला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिकेला आक्षेप घेतला असून, परवानगीविना नवीन रस्ता फोडला जात असल्याने हे काम थांबवले आहे. महापालिकेने पायाभूत सुविधांसाठी पुन्हा रस्ते फोडण्याची गरज भासणार नसल्याचा दावा केला होता, परंतु तो दावा आता फोल ठरला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेल्या विविध कामांमुळे नाशिककरांना धोकादायक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या समस्येवर तीव्र चर्चा झाली होती. महापालिकेने नवीन रस्ते बनविताना गॅस, जल वाहिनी, फायबर ऑप्टिकल आदी सेवांसाठी व्यवस्था केली जात असल्याचे सांगितले होते, परंतु सीबीएस-कॅनडा कॉर्नर या नव्या मार्गावर हे सर्व दावे खोटे ठरले आहेत. काँक्रिटीकरण कामासाठी हा मार्ग जवळपास एक वर्ष बंद होता आणि त्यानंतर तीन, चार महिन्यांपूर्वी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सोमवारी सकाळी कुलकर्णी गार्डनजवळ मजूर रस्ता फोडताना आढळले. नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी चौकशी केली असता, मजुरांनी फारूख नावाच्या ठेकेदारासाठी काम करीत असल्याचे सांगितले. संबंधित ठेकेदाराने स्मार्ट सिटी कंपनीच्या कामासाठी ढापे करीत असल्याची माहिती दिली आहे.
या ठिकाणी महापालिकेचा कोणी अभियंता उपस्थित नव्हता. रस्ता करताना ढापे करण्याची जबाबदारी कोणाची होती, नवीन रस्ता फोडल्यानंतर होणारे अपघात, रस्ते कामाची गुणवत्ता आणि नागरिकांच्या पैशांचा अपव्यय याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न डॉ. पाटील यांनी मनपा आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात विचारला आहे. रस्ता फोडण्याचे काम थांबवून खोदलेल्या ठिकाणी त्यांनी माती टाकली आहे. या कामाची चौकशी करावी, आयुक्तांची लेखी परवानगी नसल्यास ते काम पुन्हा सुरू करू नये, तसेच फोडलेला रस्ता स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराकडून दुरुस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. रस्ता काँक्रीट करण्याआधी सीसीटीव्हीच्या ढाप्यांचे नियोजन का झाले नाही, चार महिन्यांपूर्वी तयार केलेला रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ का आली, कामाच्या ठिकाणी महापालिका किंवा स्मार्ट सिटीचा अभियंता का नव्हता, आणि या सर्व नियोजनाच्या अभावाची जबाबदारी नेमकी कोणाची, असे प्रश्न डॉ. हेमलता पाटील यांनी उपस्थित केले आहेत. नागरिकांच्या पैशातून रस्ते करायचे, काही महिन्यांत ते पुन्हा फोडायचे आणि पुन्हा त्याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च करायचा याकडे लक्ष वेधत त्यांनी हा विकास आहे की नागरिकांच्या पैशांचा अपव्यय, असाही प्रश्न केला आहे.





















