New Parking Policy in Thane:ठाण्यात पैसे भरा, रस्त्यावर वाहन उभे करा

ठाणे शहरात वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. घोडबंदर परिसरात सहा महिन्यांस
ठाणे शहरात वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. घोडबंदर परिसरात सहा महिन्यांसाठी प्रायोगिक वाहनतळ योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत, १८०० वाहने उभे करण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. या ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी शुल्क आकारले जाणार असून, नियमांचे उल्लंघन केल्यास पाचपट दंडही आकारला जाणार आहे. यामुळे रस्त्यांवर होणारे बेशिस्त पार्किंग थांबविण्यात मदत होईल, अशी अपेक्षा आहे. महापालिकेने २०१३ मध्ये वाहनतळ धोरणाला मंजुरी दिली होती, त्यावेळी १७७ रस्त्यांवर ९,८५५ वाहनतळ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. २०१५ आणि २०१६ मध्ये वाहनतळ शुलकासही मान्यता देण्यात आली होती. आधुनिक वाहनतळ व्यवस्था उभारण्यासाठी खासगी संस्थेला काम देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु निविदा अंतिम झाल्या नाहीत. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला होता. २०२१ मध्ये पुन्हा हाच प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला, परंतु सखोल अभ्यासासाठी तो तहकूब करण्यात आला. आता, सहा महिन्यांच्या प्रयोगातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे संपूर्ण ठाणे शहरासाठी वाहनतळ धोरण तयार केले जाणार आहे.
या प्रायोगिक योजनेअंतर्गत, पातलीपाडा चौक ते रोडाज एन्क्लेव्ह-टीसीएस, निसर्ग तपोवन ते ऋतु इस्टेट, वाघबीळ चौक ते भूमी एकर-ब्रम्हांड फेज-८, ब्रम्हांड-पातळीपाडा जोडरस्ता आणि मेपल ते फॉरेस्ट ॲव्हेन्यू या मार्गांवर १८०० वाहने उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. या योजनेचा सविस्तर प्रस्ताव महापालिका प्रशासनाने १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी ठेवला आहे. सभेची मंजुरी मिळाल्यानंतरच या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. यामुळे वाहनतळ व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या योजनेत दुचाकींसाठी ४६५, रिक्षांसाठी १००, चारचाकींसाठी १,११५, तसेच बस, ट्रक आणि मोठ्या वाहनांसाठी ८३ जागा उपलब्ध असतील.
या योजनेत शुल्काची रचना देखील निश्चित करण्यात आली आहे. दुचाकींसाठी पहिले दोन तास १५ रुपये, त्यानंतर प्रत्येक तासाला १० रुपये शुल्क आकारले जाईल. रिक्षांसाठी पहिले दोन तास २० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक तासाला १० रुपये शुल्क असेल. चारचाकी वाहनांसाठी पहिले दोन तास ४० रुपये, तर त्यानंतर प्रत्येक तासाला २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. बस, ट्रक आणि मोठ्या वाहनांसाठी पहिले दोन तास ८० रुपये, तर त्यानंतर प्रत्येक तासाला १० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेमुळे ठाण्यातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.





















