Greater Flamingo's Visit: हवामान बदलामुळे कोयना जलाशयात फ्लेमिंगोंचा थाट

सचिन काकडे, सातारा : हिवाळ्यात दरवर्षी सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात येणाऱ्या ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ पक्ष्यांनी यंदा बामणोलीतील कोयना जलाशयावर विश्रांती घेतली आहे.
सचिन काकडे, सातारा : हिवाळ्यात दरवर्षी सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात येणाऱ्या ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ पक्ष्यांनी यंदा बामणोलीतील कोयना जलाशयावर विश्रांती घेतली आहे. या पक्ष्यांनी आपल्या प्रवासात पहिल्यांदाच या जलाशयात थांबले आहे. उजनीसारख्या उथळ पाणथळ जागांवरून आपल्या प्रजनन स्थळांकडे जात असताना, या पक्ष्यांनी मानवी हस्तक्षेप नसलेल्या कोयना जलाशयात एक दिवस थांबून विश्रांती घेतली. या अनपेक्षित भेटीमुळे कोयना परिसरातील जैवविविधतेला एक नवा आयाम मिळाला आहे. युरोप किंवा ऑस्ट्रियातून येणाऱ्या या पक्ष्यांचा प्रवास खूप लांबचा असतो, असा एक सामान्य गैरसमज आहे. परंतु, वास्तवात भारतात आढळणाऱ्या ग्रेटर फ्लेमिंगो बहुतेक वेळा देशांतर्गतच स्थलांतर करतात. गुजरातच्या कच्छच्या रणात हे पक्षी प्रजनन करतात. हिवाळ्यात कच्छमधील पाण्याची पातळी कमी झाल्यावर, अन्नाच्या शोधात हे पक्षी महाराष्ट्रातील उजनी, जायकवाडी, शिवडी आणि साताऱ्यातील खटाव येथील दलदलीच्या भागात स्थलांतर करतात. एप्रिल-मे महिन्यात ते पुन्हा गुजरात किंवा इराणच्या वायव्य भागाकडे परततात.
फ्लेमिंगोचे अन्न म्हणजे निळे-हिरवे शैवाल, छोटे क्रस्टेशियन्स आणि डासांच्या अळ्या. या अन्नामध्ये ‘कॅरोटीनॉइड्स’ नावाचे रंगद्रव्य असते, ज्यामुळे या पक्ष्यांचे पंख हळूहळू गुलाबी रंगाचे होतात. बामणोली जलाशयात फ्लेमिंगो उथळ पाण्याचे आणि चिखलाचे प्रदेश पसंत करतात, जिथे ते सहजपणे उभे राहून अन्न शोधू शकतात. कोयनेचा जलाशय हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा भाग नाही, तरीही हवामानातील अचानक बदल, वाऱ्याची दिशा किंवा प्रवासातील थकवा यामुळे या थव्याने तात्पुरती विश्रांती घेतली असण्याची शक्यता आहे. पक्षी अभ्यासकांच्या मते, कोयना जलाशयातील सुरक्षितता आणि मानवी हस्तक्षेपाचा अभाव यामुळे या पक्ष्यांना येथे थांबण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.





















