Global Tribal Day: पालघरमध्ये 'एक जिल्हा - एक रॅली' आयोजित

पालघर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यात 'एक जिल्हा - एक रॅली'चे आयोजन भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेकडून करण्यात आले आहे. यंदा या दिनाचा
पालघर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यात 'एक जिल्हा - एक रॅली'चे आयोजन भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेकडून करण्यात आले आहे. यंदा या दिनाचा विषय 'आदिवासी पारंपरिक सुईणींचा सन्मान: जीवन आणि आरोग्याचे संरक्षण' असा आहे. या उपक्रमाद्वारे आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच जिल्ह्यातील पर्यावरणीय संकटांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रॅलीद्वारे आदिवासींच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या अस्तित्वावर येणाऱ्या संकटांना तोंड देण्याचा प्रयत्न केला जाईल. या संदर्भात, जिल्ह्यातील जल, जंगल, जमीन, पर्यावरण आणि आदिवासींच्या जीवनावर गंभीर संकट निर्माण झाले आहे. विविध औद्योगिक प्रकल्प आणि विकासात्मक उपक्रमामुळे आदिवासींच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हा लढा केवळ एका समाजाचा नसून संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या पर्यावरणीय सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरतो, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
यंदाच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त दोन्ही संघटनांनी एकत्र येत 'एक जिल्हा - एक रॅली' आयोजित केली आहे. रॅलीचे आयोजन दोन वेगवेगळ्या मार्गांनी करण्यात आले आहे. आदिवासी एकता परिषद दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौक दरम्यान रॅली काढणार आहे, तर भूमिसेना दुपारी 12 वाजता बिरसामुंडा चौक (बोईसर रोड) वरून रॅली सुरू करणार आहे. या रॅलीत शेतकरी, शेतमजूर, आणि भूमिपुत्र मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत पारंपरिक नाच-गाणे आणि सांस्कृतिक एकजुटीचे प्रदर्शन होणार आहे. या रॅलीत 15,000 हून अधिक आदिवासी बांधव सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे या चळवळीला आणखी बळ मिळेल.





















