Mild Earthquake in Sangamner: संगमनेर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शनिवारी रात्री १० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ मोजली गेली असून, नाशिक-पुणे
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शनिवारी रात्री १० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ मोजली गेली असून, नाशिक-पुणे महामार्गावरील घारगाव आणि आसपासच्या काही गावांमध्ये या धक्क्यांचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला. भूकंपाच्या या हालचालींची अधिकृत नोंद नाशिक येथील 'मेरी' संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर झाली. या भूकंपामुळे तालुक्यात कुठेही मोठी वित्तहानी झालेली नाही, परंतु अचानक आलेल्या या धक्क्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी धाव घेतली. तहसीलदार धीरज मांजरे यांनी ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
संगमनेर तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत, हे यापूर्वीही घडले आहे. २०१७, २०१८, २०१९, २०२१, २०२४ आणि २०२५ या वर्षांमध्येही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू नाशिक जिल्ह्यात असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये सांगण्यात आले आहे. मंगळापूर, जवळे कडलग, पिंप्री लौकी, अजमपूर, घारगाव, कौठे बुद्रूक आणि चिखली या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये आणि कच्च्या घरांमध्ये राहाणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




















