Pune Metro: मेट्रो स्टेशनसाठी सातारा रस्त्यावरील १३९ झाडांवर कुऱ्हाड; सातारा रस्ता पुन्हा उजाड

पुणे: पुणे-सातारा रस्त्यावर भूमिगत मेट्रो मार्गिकेसाठी मेट्रो स्टेशनच्या कामासाठी १३९ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. यामध्ये चार वर्षांच्या वयापासून ते ७० वर
पुणे: पुणे-सातारा रस्त्यावर भूमिगत मेट्रो मार्गिकेसाठी मेट्रो स्टेशनच्या कामासाठी १३९ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. यामध्ये चार वर्षांच्या वयापासून ते ७० वर्षांच्या वयापर्यंतच्या झाडांचा समावेश आहे. या झाडांच्या बदल्यात मेट्रो प्रशासनाने ३,४४९ नवीन झाडे लावण्याची अट ठेवली आहे, आणि महापालिकेने जून महिन्यात मेट्रोला झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. सातारा रस्त्यावर स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे, ज्याला राज्य व केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात मार्केटयार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज स्टेशनची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये अडथळा ठरणारी झाडे छाटण्यासाठी आणि काही झाडे पूर्णतः काढून टाकण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात महामेट्रोने महापालिकेकडे परवानगी मागितली होती. महापालिका आयुक्तांनी मागील महिन्यात या परवानगीला मान्यता दिली आहे. १३९ झाडांपैकी ८७ झाडांचे पुर्नरोपण करण्यात येणार आहे, तर उर्वरित झाडे छाटण्यात येणार आहेत. पूर्णतः काढून टाकण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात मेट्रो प्रशासनाने ३,४४९ नवीन झाडे लावण्याची अट ठेवली आहे.
मेट्रो प्रशासनाने मागील काही दिवसांत झाडांची छाटणी केली असून पुनर्रोपणासाठीची झाडे आठ ते दहा फुटांपर्यंत निष्पर्ण केली आहेत. यामध्ये रेन ट्री, बदाम, पिंपळ, उंबर, सुबाभूळ, गुलमोहर, अशोक, कडुनिंब, आवळा, चिंच, काशिद, कारेडिया या प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. मात्र, झाडे तोडण्याबद्दल या परिसरातील नागरिकांना काहीही कल्पना नाही. बिबवेवाडी येथील डी मार्ट समोरील झाडे मोठ्या प्रमाणावर छाटल्यानंतर नागरिकांना या बाबतीत माहिती मिळाली आहे. रस्ता रुंदीकरणानंतर पुन्हा एकदा झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.





















