Health Department Recruitment: आरोग्य विभागातील पदभरती, पदोन्नतीला गती

मुंबई : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने उपाययोजना करण्या
मुंबई : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य भवन येथे झालेल्या बैठकीत त्यांनी प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियेला गती देण्यावर जोर दिला. विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागाच्या कामकाजाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होतो, त्यामुळे कोणत्याही स्तरावर दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनातील निर्णय प्रक्रिया जलद गतीने पार पडली पाहिजे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत आरोग्य विभागातील गट-क व गट-ड संवर्गातील नवीन पदभरतीची सद्यस्थिती आणि विविध संवर्गांतील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. मनुष्यबळाच्या अभावामुळे प्रभावित ठिकाणी तातडीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश आबिटकर यांनी दिले. पदभरतीची प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी ती कोणत्याही अनावश्यक विलंबाविना पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अधिपरिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी, परिविक्षाधीन कालावधी, पदोन्नती यासारख्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकालात योग्य संधी आणि पदोन्नती मिळणे आवश्यक आहे, यावर त्यांनी जोर दिला. पदोन्नतीच्या प्रक्रियेत अनावश्यक विलंब टाळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.





















