Sister Donates Kidney to Brother: दिव्यांग असूनही बहिणीने दिली भावाला किडनी; भावाला मिळाले नवे आयुष्य !

जिवती तालुक्यातील महाराजगुडा येथे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि त्यागाचे एक अद्वितीय उदाहरण समोर आले आहे. माजी पोलिस पाटील तुकाराम राठोड यांचे पुत्र किशोर र
जिवती तालुक्यातील महाराजगुडा येथे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि त्यागाचे एक अद्वितीय उदाहरण समोर आले आहे. माजी पोलिस पाटील तुकाराम राठोड यांचे पुत्र किशोर राठोड (३५) यांच्यावर अहमदाबादच्या रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. विशेष म्हणजे, सुरेखा तुकाराम राठोड, किशोरची मोठी बहीण, जी शारीरिक अपंग आहे, तिने स्वतःची किडनी दान करून आपल्या भावाला नवजीवन दिले आहे. किशोरच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी अहमदाबादच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीझेस अँड रिसर्च सेंटर' येथे दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तातडीने किडनी प्रत्यारोपणाची शिफारस केली. अशा कठीण परिस्थितीत सुरेखा हिने कोणताही संकोच न करता किडनी दान करण्याचा निर्णय घेतला, जे तिच्या धैर्याचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
सुरेखा हिचा हा त्याग आणि धाडस समाजासाठी एक प्रेरणा ठरली आहे. ती स्वतः दिव्यांग असूनही आपल्या भावाच्या जीवनासाठी केलेला हा त्याग अत्यंत प्रशंसनीय आहे. डॉक्टरांच्या पथकाने सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्यांनंतर ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. सध्या सुरेखा आणि किशोर दोघांचीही तब्येत स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेमुळे अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे आणि 'भाऊ म्हणजे केवळ नाते नसून आयुष्यभराची जबाबदारी असते' हा सकारात्मक संदेश समाजात गेला आहे.





















