Advice to Students:पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना सल्ला; ‘प्रश्नांवर उपायही शोधा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना अंधानुकरण टाळण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, कोणतीही गोष्ट विचार न करता स्वीकारू नका आणि ती गोष्ट प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना अंधानुकरण टाळण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, कोणतीही गोष्ट विचार न करता स्वीकारू नका आणि ती गोष्ट प्रयोगाच्या कसोटीवर तपासून पाहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर थांबू नये, तर त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. आयआयटी दिल्लीच्या ५७व्या पदवीदान समारंभात बोलताना मोदींनी विद्यार्थ्यांना आयुष्यभर कुतूहल आणि शिकण्याची वृत्ती जिवंत ठेवण्याचा सल्ला दिला. बदलत्या तंत्रज्ञानामुळे जगाच्या राजकीय आणि सामरिक परिस्थितीत मोठे बदल होत आहेत, त्यामुळे सतत शिकत राहणारा व्यक्तीच यशस्वी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आव्हानांवर नवे उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाल्यास तीच आव्हाने संधी बनतात, असे मोदी म्हणाले. आयआयटीची पदवी म्हणजे केवळ चांगले गुण किंवा आकर्षक नोकरीचे पॅकेज मिळवण्याचे साधन नाही, तर ती विद्यार्थ्यांना अवघड समस्या सोडवण्याची क्षमता देते, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयातील परीक्षांप्रमाणे आयुष्यातील आव्हाने 'अभ्यासक्रमाबाहेरची' असतात, त्यामुळे समाजाने प्रश्न मानणे बंद केलेल्या समस्यांना ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवरील अनावश्यक स्पर्धेपासून दूर राहावे, असा सल्ला मोदींनी दिला. मित्रांचे पगार, नोकर्या, स्टार्टअप किंवा मिळालेले यश यांच्याशी तुलना करू नका. आयुष्य हे कोणतेही 'लीडरबोर्ड' नाही; तुमची खरी शर्यत दुसऱ्या कोणाशी नसून स्वतःशी आहे, असे ते म्हणाले. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देत स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. पदवीदान समारंभात पदके आणि पुरस्कार मिळवणार्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मोदींनी मुलींच्या कमी सहभागाकडे लक्ष वेधले. पदकविजेत्यांमध्ये एक-दोन मुली असत्या तर आणखी चांगले झाले असते; केवळ एक-दोन नव्हे, तर अशा अनेक मुली असायला हव्यात, असे ते म्हणाले. देश आर्थिक, तांत्रिक आणि औद्योगिक अशा सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नशील असून हा 'विकसित भारता'चा भक्कम पाया आहे, असे मोदींनी सांगितले. अंतराळ क्षेत्रातील वेगवान विस्तार, देशांतर्गत सेमीकंडक्टर निर्मिती, स्टार्टअप क्षेत्रातील वाढ, डिजिटल व्यवहार आणि फिनटेकमुळे तरुणांना नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 'भारतात चिप तयार करणारा माझ्या घराण्यातील पहिला व्यक्ती' असे अभिमानाने सांगणारा तरुण आज दिसत आहे, असे मोदींनी सांगितले. देशातील विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना दर्जेदार संशोधन साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी 'वन नेशन, वन सब्क्रिरप्शन' योजना सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून जागतिक दर्जाची संशोधन नियतकालिके देशातील लहान शहरांमधील विद्यार्थ्यांनाही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळू शकतात. विद्यार्थ्यांच्या पदवीचा अर्थ देशासाठी योगदान देण्याची जबाबदारी असा असल्याचे मोदींनी सांगितले. मागील पिढीसमोर स्वातंत्र्य मिळवण्याचे एकच मोठे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी त्याग आणि तपश्चर्या केली. पुढील ३० वर्षांत देशाच्या विकासाच्या उद्दिष्टांशी आपल्या करिअरचा संबंध जोडून आजच्या पिढीने स्वतःचा वारसा निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक निर्णय घेताना त्यातून देशाला काय फायदा होईल आणि देशाची कोणती गरज पूर्ण होईल, याचा विचार करा, असे त्यांनी सांगितले.





















