AICTE Approval Issues:राज्यातील १५ महाविद्यालये मान्यतेविना

मुंबई: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी, व्यवस्थापन, एमसीए, वास्तुकला आणि हॉटेल व्यवस्थापन यांसारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांच्या मान्यता
मुंबई: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी, व्यवस्थापन, एमसीए, वास्तुकला आणि हॉटेल व्यवस्थापन यांसारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांच्या मान्यता नसलेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील १५ महाविद्यालयांचा समावेश आहे, ज्यात मुंबई आणि ठाण्यातील महाविद्यालये सर्वाधिक आहेत. एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय तांत्रिक अभ्यासक्रम चालवणारी महाविद्यालये बेकायदेशीर ठरतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी दरवर्षी अशा महाविद्यालयांची यादी जाहीर केली जाते. यंदा जाहीर केलेल्या यादीत देशभरातील २७२ महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये दिल्लीमध्ये सर्वाधिक ६८ महाविद्यालये आहेत, त्यानंतर तेलंगणा ३५, पश्चिम बंगाल २४, कर्नाटका २३ आणि उत्तर प्रदेशातील २१ महाविद्यालयांचा समावेश आहे. महाराष्ट्रात १८ महाविद्यालये आहेत, ज्यात मुंबईमधील ९, ठाण्यातील ६, नाशिकमधील २ आणि रायगडमधील १ महाविद्यालयाचा समावेश आहे. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये नागपाडा येथील ए. के. आय. कॉलेज ऑफ अलाइड हेल्थ, अंजुमन खैरुल इस्लाम इन्स्टिट्यूट ऑफ एमजीएमटी अँड टेक्नॉलॉजी, एल्फिन्स्टन महाविद्यालय, आयसीआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एमआयएसबी बोकोनी, फाजलानी अल्टिअस बिझनेस स्कूल आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. ठाण्यातील महाविद्यालयांमध्ये एडूवे ॲकॅडमी प्रा. लि., आयबीएसएआर, मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि बेलापूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट यांचा समावेश आहे. नाशिकमधील आर.सी.एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ओझर विकास संस्थेचे व्यवस्थापन व संशोधन केंद्र आणि अलिबागमधील मॉर्डन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग ॲंड मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांची माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी आणि विनामान्यता असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन एआयसीटीईने केले आहे. याबाबत एल्फिन्स्टन महाविद्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, या महाविद्यालयात एआयसीटीईशी संबंधित कोणताही अभ्यासक्रम शिकवला जात नाही, त्यामुळे आमचा एआयसीटीईच्या मान्यतेशी कोणताही संबंध नाही.




















