Vidarbha Rice Export:धान उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; विदर्भातील 'बॉइल' तांदूळ जगभर गाजतोय!

विदर्भातील तांदूळ उद्योगासाठी यंदाचे वर्ष आशादायी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या वर्षी सुमारे २,१०० कोटी रुपयांच्या तांदळाची निर्यात झाल्यानंतर यंदा त्यात सु
विदर्भातील तांदूळ उद्योगासाठी यंदाचे वर्ष आशादायी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या वर्षी सुमारे २,१०० कोटी रुपयांच्या तांदळाची निर्यात झाल्यानंतर यंदा त्यात सुमारे ५०० कोटी रुपयांची वाढ होऊन २,६०० कोटी रुपयांपर्यंत निर्यात पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. निर्यातीत वाढ झाल्याने धानाला चांगला बाजारभाव मिळत असून त्याचा थेट फायदा धान उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. विदर्भातून यंदा सुमारे ८ लाख टन तांदळाची निर्यात होण्याची शक्यता आहे. या निर्यातीत बॉइल (Parboiled) तांदळाचा तब्बल ९५ टक्के वाटा आहे. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये बॉइल तांदळाला मोठी मागणी असून, त्याशिवाय अरब देश, बांगलादेश, चीन तसेच अन्य देशांमध्येही विदर्भातील तांदूळ निर्यात केला जात आहे. विदर्भातील तांदूळ निर्यातीत गोंदिया जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या वर्षी झालेल्या २,१०० कोटी रुपयांच्या निर्यातीत जवळपास १,५०० कोटी रुपयांची निर्यात एकट्या गोंदिया जिल्ह्यातून झाली होती. यंदाही हा वाटा वाढण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर परिसरातील राइस मिलमधून मोठ्या प्रमाणावर तांदळावर प्रक्रिया केली जाते. विदर्भातून दरवर्षी डिसेंबरपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत तांदूळ निर्यात केली जाते. या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीनुसार मोठ्या प्रमाणात तांदूळ परदेशात पाठविला जातो. यंदा उत्पादन चांगले राहिल्यास आणि जागतिक बाजारपेठ अनुकूल राहिल्यास निर्यातीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तांदळाला प्रति टन ३५० ते ३७५ डॉलर दर मिळत आहे. त्यामुळे देशांतर्गत धान खरेदीचे दरही वाढले असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. केंद्र सरकारने यंदासाठी धानाचे किमान आधारभूत मूल्य (MSP) २,३८९ रुपये प्रति क्विंटल निश्चित केले आहे. मात्र निर्यातीतून मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे खुल्या बाजारातही धानाला समाधानकारक भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.



















