Farmers Loan Waiver Scheme:शेतकरी कर्जमाफी योजनेत ५ हजार कोटींचा निधी जमा

मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ९४ हजार आयकरदाते शेतकरी अपात्र ठरले आहेत. योजनेत साम
मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ९४ हजार आयकरदाते शेतकरी अपात्र ठरले आहेत. योजनेत सामील झालेल्या १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांपैकी ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ हजार २८ कोटी रुपये जमा करण्यात आले. यानंतर राज्य सरकारने बँकांना निर्देश दिले आहेत की, या शेतकऱ्यांना त्वरित नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेचा आढावा घेतला, ज्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते. योजनेअंतर्गत विविध बँकांनी ३२ लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. सहकार आयुक्त व निबंधक यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची पहिली यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, १२ लाख १० हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज ६ लाख २२ हजार पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात ५ हजार २८ कोटी रुपये ऑनलाईन पोर्टलद्वारे हस्तांतरित करण्यात आले. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज वाटप करण्याबाबत सर्व बँकांना शासनाने निर्देश दिले आहेत. पहिल्या यादीतील उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम हस्तांतरित केली जाईल. राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत आहे, त्यांना दोन लाखाच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे. याशिवाय, दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची दोन लाखांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर एकवेळ समझोता अंतर्गत त्यांच्याही कर्ज खात्यात सरकार दोन लाख रुपये जमा करणार आहे.



















