Fake Seeds: बोगस बियाण्यांचा 'मास्टरमाइंड' कोण? अकोला पोलिसांनी १३ प्रकरणांसाठी एसआयटी नेमली

अकोला जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक फसवणुकीविरोधात अकोला पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या
अकोला जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक फसवणुकीविरोधात अकोला पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या पथकाची स्थापना बोगस बियाणे प्रकरणांचा सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यासाठी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बोगस बियाणे विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एसआयटीचे नेतृत्व अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी करणार आहेत आणि यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी देखील समाविष्ट आहेत. त्यामुळे बोगस बियाणे प्रकरणांचा तपास अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा आहे.
बोगस बियाणे प्रकरणांच्या तपासासाठी गठित करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात अकोटचे सहाय्यक पोलिस अधीक्षक, अकोला शहराचे पोलिस उपअधीक्षक, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी आणि संबंधित गुन्ह्यांचे तपास अधिकारी यांचा समावेश आहे. या पथकाने बोगस बियाण्यांच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि विक्री यामागे कोणती साखळी कार्यरत आहे, याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जुलै २०२६ मध्ये अकोला जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बोगस बियाण्यांशी संबंधित १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) तसेच बियाणे अधिनियम आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील संबंधित तरतुदींच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे.





















