Waste Management Crisis:वसई-विरारमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा, कचराभूमीवर उभे राहिले अवाढव्य डोंगर

वसई: वसई-विरार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेत गंभीर बिघाड झाला आहे, ज्यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. गेल्या वर्षभरापासून महापाल
वसई: वसई-विरार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेत गंभीर बिघाड झाला आहे, ज्यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. गेल्या वर्षभरापासून महापालिकेचा बायोमायनिंग प्रकल्प ठप्प झाल्याने आणि कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक जागा उपलब्ध न राहिल्यामुळे, कचराभूमीवर कचऱ्याचे मोठे ढीग उभे राहिले आहेत. वसई-विरार शहरातून दररोज १,००० ते १,२०० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो, जो वसई पूर्वेतील गोखीवरे आणि भोयदापाडा येथील कचरा भूमीवर टाकला जातो. या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे, परंतु बायोमायनिंग प्रकल्प बंद असल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचून नागरिकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत आहे. भोयदापाडा आणि गोखिवरे येथील नागरिक कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. साचलेल्या कचऱ्यामुळे येणारी तीव्र दुर्गंधी, कचऱ्याला लागणाऱ्या आगींमुळे निर्माण होणारा विषारी धूर, आणि पावसाळ्यात वाहून येणारे सांडपाणी यामुळे या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे यांनी या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
कचरा साठवण्यासाठी जागा अपुरी पडत असताना, नालासोपाऱ्यातील अग्रवाल नगर, सनसिटी, श्रीप्रस्थ रस्ता, महामार्ग आणि रिद्धी विनायक रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे महापालिका घनकचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कचराभूमीवर पूर्वी १५ लाख मेट्रिक टन कचरा साचलेला होता, त्यापैकी गेल्या दोन वर्षांत केवळ ५ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया झाली आहे, तर याच काळात नवीन ५ लाख मेट्रिक टन कचऱ्याची भर पडली आहे. बायोमायनिंगचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येत असून, हा प्रकल्प लवकरच पूर्ववत सुरू केला जाईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी स्पष्ट केले आहे.





















