Honor for Kolhapur Scientist:कोल्हापूरच्या जावयाचा सन्मान; लघुग्रहाला श्रीराम सरण यांचे नाव दिले, इस्रोच्या शास्त्रज्ञाचा गौरव

कोल्हापूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्रो) शास्त्रज्ञ डॉ. श्रीराम सरण यांचे नाव आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने एका लघुग्रहाला दिले आहे. हा विशेष सन्
कोल्हापूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्रो) शास्त्रज्ञ डॉ. श्रीराम सरण यांचे नाव आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने एका लघुग्रहाला दिले आहे. हा विशेष सन्मान त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी आहे, ज्यामुळे कोल्हापूर आणि संपूर्ण भारताच्या विज्ञान क्षेत्रात आनंद आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेच्या वर्किंग ग्रुप फॉर स्मॉल बॉडीज नोमेनक्लेचरने (डब्ल्यूजीएसबीएन) या लघुग्रहाचे अधिकृत नाव (२०७३४ श्रीरामसरन १९९९ एक्स ए १६९) जाहीर केले आहे. चंद्र, लघुग्रह आणि इतर ग्रहांच्या पृष्ठभागावरील रेजोलिथ तसेच ग्रह रडार संशोधनात त्यांच्या योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. सध्या डॉ. सरण इस्रोच्या अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटरमध्ये कार्यरत आहेत आणि चांद्रयान-२ मोहिमेतील ड्युअल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक अपर्चर रडार संशोधनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच, इस्रोच्या आगामी व्हीनस ऑर्बिटर मिशनमधील रडार पेलोडचे विज्ञानप्रमुख म्हणूनही ते कार्यरत आहेत.
डॉ. श्रीराम सरण यांच्या पत्नी डॉ. रेवती सरण (पूर्वाश्रमीच्या डॉ. रेवती मोरे) या कोल्हापूरच्या आहेत. त्या कावळा नाका येथील होमिओपॅथिक कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश नाथाजी मोरे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे या जागतिक सन्मानामुळे मोरे कुटुंबासह संपूर्ण कोल्हापूरमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लघुग्रहाला शास्त्रज्ञाचे नाव देणे हा जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. आजवर केवळ काही भारतीय शास्त्रज्ञांच्या नावाने लघुग्रहांचे नामकरण झाले आहे. त्या मानाच्या यादीत आता डॉ. श्रीराम सरण यांचे नाव अभिमानाने जोडले गेले आहे. हा सन्मान भारतीय विज्ञानविश्वासाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो कोल्हापूरसाठीही अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे.



















