Death Trap on Undri Road:उंड्रीच्या मुख्य रस्त्यावर 'डेथ ट्रॅप'..! एकाच उघड्या चेंबरने घेतले अनेकांचा बळी, ज्येष्ठ महिला जखमी

उंड्री : उंड्रीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या ड्रेनेज चेंबरला झाकण नसल्याने एक ज्येष्ठ महिला जखमी झाल्याची घटना वडाची वाडी रस्त्यावर घडली आहे. यापूर्वीही याच रस्
उंड्री : उंड्रीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या ड्रेनेज चेंबरला झाकण नसल्याने एक ज्येष्ठ महिला जखमी झाल्याची घटना वडाची वाडी रस्त्यावर घडली आहे. यापूर्वीही याच रस्त्यावर उघड्या चेंबरमध्ये रिक्षा अडकून अपघात झाला होता. मात्र, पालिका प्रशासनातील अधिकारी 'एसआयआर'च्या कामात व्यस्त असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींचा संपर्क साधणेही कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी 'आमच्या समस्या सोडवणार कोण?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. उंड्रीच्या वडाची वाडी रस्त्यावर अनेक दिवसांपासून चेंबरचे झाकण नसल्यामुळे पावसाचे पाणी त्यामध्ये साचत आहे. रस्त्यावर पाण्यामुळे चेंबर दिसत नाही आणि त्यामुळे वाहनचालक व पादचारी त्यात पडून जखमी होत आहेत. नुकतीच एक रिक्षा उघड्या चेंबरमध्ये अडकून अपघातग्रस्त झाली आहे. या घटनेत ज्येष्ठ महिला जखमी झाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र टीका केली आहे. मागील आठवड्यात आरएमसी प्रकल्पातील जड वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतरही जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. आरएमसी प्रकल्पांमुळे उंड्री परिसरात दिवसभर डंपर आणि काँक्रीट मिक्सरची वर्दळ असते, ज्यामुळे वाहतूक कोंडी, धुळीचे प्रदूषण, खराब रस्ते आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांनी महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. उघड्या चेंबर्सवर मजबूत झाकण बसविणे, आरएमसी प्रकल्पातील जड वाहनांवर नियंत्रण आणणे, वाहतूक नियोजन सुधारणे आणि उंड्री परिसरातील धोकादायक ठिकाणांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या कोणत्याही गंभीर दुर्घटनेची जबाबदारी प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींवरच राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. स्थानिक नगरसेवक निवृत्ती बांदल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांचा मोबाइल बंद असल्याचे आढळले. गेल्या आठवड्यापासून उंड्रीच्या मुख्य रस्त्यावर उघड्या चेंबरमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. चेंबरची झाकणे नसल्यामुळे अनेक अपघात घडले आहेत आणि एका ज्येष्ठ महिलेला उघड्या चेंबरमध्ये पडून दुखापत झाली आहे. याशिवाय अनेक दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकही या खड्ड्यांमध्ये अडकून अपघातग्रस्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. महापालिका नेमकी कशाची वाट पाहत आहे? एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? - प्रमोद (नाना) भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना



















