Deep Amavasya 2026: दीप अमावस्येनिमित्त कपभर पिठापासून करा कणकेचे दिवे- सोपी पारंपरिक पद्धत, कमी तेलात दिवा जास्त उजळेल

आषाढ महिना संपत आला की श्रावण महिन्याच्या आगमनाची उत्सुकता वाढते. या काळात विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. आषाढ महिन्याचा शेवट दीप अमावस्येच्या सणाने होतो.
आषाढ महिना संपत आला की श्रावण महिन्याच्या आगमनाची उत्सुकता वाढते. या काळात विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. आषाढ महिन्याचा शेवट दीप अमावस्येच्या सणाने होतो. या दिवशी घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सुख-समृद्धी वाढवण्यासाठी दिव्यांची पूजा केली जाते. दीप अमावस्येनिमित्त अनेक घरांमध्ये समई, पणत्या आणि निरांजना यांची स्वच्छता करून विधिवत पूजा केली जाते. या विशेष प्रसंगी, देवाला निवेद्य म्हणून आणि पूजेसाठी कणकेचे गोड दिवे बनवले जातात. कणकेचा दिवा धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. कणकेचे दिवे बनवताना अनेकांना ते मऊ पडतात किंवा त्यांना योग्य आकार येत नाही, परंतु एक कप गव्हाच्या पिठापासून आपण आकर्षक आणि कडक कणकेचे दिवे तयार करू शकतो. हे दिवे कमी तेलात किंवा तुपातही अधिक काळ तेवत राहतात. त्यामुळे दीप अमावस्येनिमित्त कणकेचे दिवे तयार करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.
कणकेचे दिवे तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे १ कप गव्हाचे पीठ, अर्धा कप गूळ, १ लहान चमचा साजूक तूप, १ छोटा चमचा वेलची पूड आणि आवश्यकतेनुसार पाणी. सर्वप्रथम, एका भांड्यात गूळ आणि थोडे पाणी घालून मंद आचेवर गूळ वितळवून घ्या. गुळाचा पाक बनवायचा नाही, फक्त गूळ पाण्यात विरघळवून त्याचे पाणी थंड होऊ द्या. नंतर एका परातीत गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात वेलची पूड व साजूक तूप घालून चांगले चोळा. यामुळे दिवे कडक आणि सुबक होतील. थंड झालेले गुळाचे पाणी थोडे-थोडे करून पीठात घाला आणि घट्ट गोळा मळा. पीठ जितके घट्ट असेल, तितके दिव्याचा आकार चांगला टिकून राहतो.





















