Teacher Transfers Request:जुन्या शिक्षकांच्या विनंती बदल्या करा

बारामती: राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत विनंती बदल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिक्षण सेवकांच्या नवीन भरतीपूर्वी व
बारामती: राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत विनंती बदल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिक्षण सेवकांच्या नवीन भरतीपूर्वी विद्यमान शिक्षकांना विनंती बदल्यांची संधी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. या संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी याबाबतची मागणी केली आहे. शिक्षण सेवकांच्या शिष्टमंडळाने मंत्री गोरे यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या विविध समस्या व अडचणींवर चर्चा केली. अनेक शिक्षक त्यांच्या कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर कार्यरत आहेत, ज्यामुळे त्यांना कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागतो, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. त्यामुळे, जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत कार्यरत शिक्षकांना विनाअट विनंती बदल्यांची संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिक्षण सेवक संघाने शासनाकडे विनंती केली आहे की, शिक्षकांच्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार करून विशेष बाब म्हणून बदल्या करण्याचा निर्णय घ्यावा. यावेळी संघाचे नेते संभाजीराव थोरात, बाळासाहेब मारणे आणि राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील उपस्थित होते. शिक्षण सेवक भरतीपूर्वी या विनंती बदल्यांचा निर्णय होणार का, याकडे राज्यातील हजारो शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रखडल्यामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक परिस्थितीवर गांभीर्याने विचार केला आहे. त्यांनी शिष्टमंडळाला दिलासा दिला की, आंतरजिल्हा बदल्या सुरू करण्याबाबत विभाग सकारात्मक आहे आणि शिक्षकांच्या पाठीशी आहेत. शिक्षण क्षेत्रातील अनेक अवघड जागा भरण्यासाठी अनेक सेवाजेष्ठ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. यामध्ये अनेक महिला शिक्षिका आणि कनिष्ठ शिक्षकांना तालुकाबाह्य बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक वर्षे विनावेतन काम केलेल्या वस्तीशाळा शिक्षकांचा समावेश आहे.





















