Scholarship Exam Final Result: चौथी, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर… एकूण ३३ हजार २८१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक!

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित केलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ए
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित केलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत एकूण २७.०९ टक्के निकाल लागला असून, चौथी आणि सातवीच्या एकत्रित ३३ हजार २८१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. परीक्षा परिषदेतर्फे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी याबाबतची माहिती दिली. चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी राज्यभर विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. त्यानंतर २५ जुलै रोजी अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये गुणपडताळणीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल तयार करण्यात आला. इयत्ता चौथी आणि सातवीच्या परीक्षेसाठी एकूण ११ लाख ५६ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १० लाख ९१ हजार २५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २ लाख ९५ हजार ५४६ विद्यार्थी पात्र ठरले, तर ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
इयत्ता चौथीच्या परीक्षेसाठी ६ लाख ९४ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ५७ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १ लाख ७६ हजार ५८६ विद्यार्थी पात्र ठरले, तर १६ हजार ६९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. चौथीच्या परीक्षेचा एकूण निकाल २६.८७ टक्के लागला. दुसरीकडे, इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी ४ लाख ६२ हजार १४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४ लाख ३३ हजार ८७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ लाख १८ हजार ९६० विद्यार्थी पात्र ठरले, तर १६ हजार ५८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. सातवीचा एकूण निकाल २७.४२ टक्के लागला आहे.





















