Congress leader's ashram school lacks beds for 25 years: संतापजनक घटना जपतलाईतील ३ विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर

गडचिरोली: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून अनेक वर्षांपासून अनुदान मिळत असतानाही त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचे भीषण वास्तव
गडचिरोली: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून अनेक वर्षांपासून अनुदान मिळत असतानाही त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचे भीषण वास्तव जपतलाई येथील घटनेने उघड केले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांच्या संबंधित असलेल्या धानोरा तालुक्यातील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा, ज्याला अनुदानित आदिवासी आश्रमशाळा म्हणून ओळखले जाते, येथे ७९ मुलींना खाटांऐवजी जमिनीवर गाद्या टाकून झोपविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या २५ वर्षांपासून विद्यार्थिनींसाठी खाटांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. याच वसतिगृहात सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर आश्रमशाळांमधील सुविधा, देखभाल आणि सुरक्षेच्या नावाने होणाऱ्या खर्चाचे वास्तव आता ऐरणीवर आले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाची सुविधा मिळावी, सुरक्षित वातावरणात त्यांचे संगोपन व्हावे आणि त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाकडून अनुदानित आश्रमशाळांना निधी दिला जातो. मात्र, जपतलाईतील चित्र या संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. विद्यार्थिनींसाठी आवश्यक असलेली साधी खाटदेखील वर्षानुवर्षे उपलब्ध झाली नसेल, तर शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा विनियोग नेमका कुठे होतो, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. वसतिगृहातील ७९ मुली एकाच ठिकाणी जमिनीवर गाद्या टाकून झोपत असल्याचे चित्र समोर आले आहे. निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यांना जमिनीवर झोपविले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेषतः सर्पदंशाचा धोका असलेल्या दुर्गम आणि जंगलव्याप्त भागात जमिनीवर झोपण्याची व्यवस्था कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्न या दुर्घटनेनंतर अधिक गंभीर झाला आहे.





















