Pandharpur Wari 2026:आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला

देहूगाव : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराजांची पालखी रविवारी, ९ जुलै रोजी, दुपारी दोनच्या सुमारास देहूनगरीत परतली. 'पंढरीची वारी झाली, आता त
देहूगाव : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराजांची पालखी रविवारी, ९ जुलै रोजी, दुपारी दोनच्या सुमारास देहूनगरीत परतली. 'पंढरीची वारी झाली, आता तुकोबांच्या चरणी परतलो...' या भावनेने भरलेली ही वारी भक्तांच्या मनात एक अद्वितीय आनंद निर्माण करत आहे. पालखी वेशीवर येताच, ग्रामस्थांसह देहू नगरपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा सभापती सुधीर काळोखे, कर अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे आणि प्रशासन अधिकारी प्रियांका कदम यांनी तुकोबारायांच्या पालखीला हार अर्पण करून स्वागत केले. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या नामस्मरणाने देहूनगरी भक्तिरसात न्हालेली होती. ३५ दिवसांच्या प्रवासानंतर या पालखीने संत भूमी देहूनगरीत पुनरागमन केले आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या पालखी सोहळ्याचे आगमन होताच ग्रामस्थ, वारकरी, भाविक आणि विविध दिंड्यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दही भाताचा नैवेद्य दाखवून पालखी रथाचे औक्षण करण्यात आले. तळवडे, विठ्ठलनगर, माळीनगर, चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, येलवाडी, सांगुर्डीसह पालखी सोहळ्यात सहभागी होऊ न शकलेल्या हजारो भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी गर्दी केली. देहूतील प्रमुख मार्गांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध दिंड्यांमधून सुरू असलेले अभंग गायन, टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणात न्हालेला होता.
पालखीच्या स्वागतानंतर देहूनगरीत पुन्हा एकदा तुकोबांच्या अभंगांचा आणि हरिनामाचा स्वर घुमला. पालखी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिर, बाजारआळी मार्गे जन्मस्थान मंदिर व विश्वंभर महाराज मंदिरासमोर आल्यानंतर 'श्री संताचीये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत' या अभंगाचे गायन करण्यात आले. वारीत सहभागी झालेल्या सर्व दिंड्यांच्या विणेकऱ्यांना व सेवेकरी यांना पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे व उमेश महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे व संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते मानाचा श्रीफळ प्रसाद देण्यात आला. एकादशीच्या निमित्ताने देहूच्या देऊळ वाड्यात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे मंदिरात विधिवत महापूजा करण्यात आली. भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. पालखी चिंचोली येथील शनी मंदिर परिसरातील पटांगणावर काही काळ विसावली. दुपारी एकच्या सुमारास पालखी संतभूमी देहूकडे मार्गस्थ झाली. या सर्व घटनेत भक्तांची एकता आणि श्रद्धा स्पष्टपणे दिसून आली, ज्यामुळे पंढरपूरच्या वारीची महत्त्वता आणखी वाढली आहे.





















